आईच्या अभिमानासाठी…भाग-1

एका आवाजाचा, एका स्वप्नाचा आणि एका आईच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच आनंद पाहण्यासाठी केलेला चौदा वर्षांचा वनवास…

काही स्वप्नं स्वतःसाठी नसतात, तर ती आईच्या डोळ्यांतला अभिमान परत आणण्यासाठीची ही असतात. नादाची किंमत आणि जिद्दीचा परिणाम कधीच लगेच दिसत नाही. त्यासाठी स्वतःला तुटू द्यावं लागतं, हरू द्यावं लागतं, आणि पुन्हा उभं राहावं लागतं.  K.G.F मध्ये आई आणि मुलाची गोष्ट जगाविरुद्ध होती, पण इथं वेगळचं आहे. आई आणि मुलाची गोष्ट स्वतःशीचं आहे. मुलाच अस्तित्व  सिद्ध करण्याची आणि आईच्या अभिमानासाठीची....

मी इयत्ता पहिलीत होतो. संपूर्ण देशात १५ ऑगस्टचा उत्साह अर्थातच भारताचा स्वातंत्र्यदिन सगळीकडे मोठ्या आनंदात साजरा केला जातो. माझ्या गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईसारवाडी मध्येही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात वकृत्व स्पर्धा म्हणजेच भाषणाचा कार्यक्रमही होता. त्यात माझ्या वर्गातील एक मुलगा व्यासपीठावर गेला, त्याने खुप छान भाषण केलं आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. कार्यक्रम संपला. शाळेतून मिळालेली दोन बिस्किटं आणि गोळ्या घेऊन मीही आनंदात घरी निघालो. घरी पोहोचताच आईने दारातूनच आवाज दिला, “भैय्या… तू आज शाळेत भाषण केलंस ना?” मी काही बोलायच्या आतच ती पुन्हा म्हणाली, "मी ओळखलं… तो तुझाच आवाज होता!  मी घरात होते, पण तुझा आवाज कानावर आला आणि मी लगेच अंगणात येऊन उभी राहिले. तुझं पूर्ण भाषण ऐकलं मी… खूप भारी वाटलं मला!"

त्या क्षणी मी तिला खरं सांगू शकलो असतो, की व्यासपीठावर बोलणारा मुलगा मी नव्हतो. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्यातला “नाही” कुठेतरी हरवून गेला. मी फक्त तिच्या “हो” मध्ये माझं “हो” मिसळत राहिलो. आजही त्या दिवसाची एक गोष्ट स्पष्ट आठवते. आईच्या चेहऱ्यावरचा तो आनंद. तो साधा आनंद नव्हता. तो तिच्या मुलाचा आवाज ऐकल्याचा अभिमान होता. आणि कदाचित त्या दिवशी पहिल्यांदा मनात एक छोटंसं स्वप्न जन्माला आलं होतं.  “आज ज्याचा आवाज आईने ऐकला… तो मी नव्हतो. पण एक दिवस असा येईल, जेव्हा माझ्यासाठीच लोक टाळ्या वाजवतील आणि माझी आई अभिमानाने माझं भाषण ऐकेल.”

पण नियती लहानपणापासूनच परीक्षा घ्यायला सुरुवात करते…

लहानपणी सगळ्यांच्याच आवाजात एकसारखाच निरागसपणा असतो. कोणाचं बोलणं स्पष्ट, कोणाचं अडखळणारं, पण त्या वयात आवाजाला दोष नसतो, फक्त बालपण असतं. जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण चालायला आणि बोलायला शिकत असतो. चालायला शिकण्याच्या काही पायऱ्या असतात. पहिली पायरी अंगावर पडणं. दुसरी घरात रांगत फिरणं. तिसरी भिंतीला, खुर्चीला, टेबलला धरून उठण्याचा प्रयत्न. आणि शेवटची इवल्याशा पावलांनी घरभर धावत सुटणं. या सगळ्या पायऱ्या पार केल्या की आपण म्हणतो, “आता हे मूल चालायला लागलं.”

बोलण्याचंसुद्धा अगदी तसंच असतं. पहिली पायरी म्हणजे जन्मानंतरचं रडणं, आणि मग कुणीतरी रडण्यावरुण अंदाज काढत म्हणतं, “अरे, पोराचा आवाज किती मोठा आहे!”  किंवा “आवाज भारी आहे बरं का!” दुसरी पायरी स्वतःचीच एक वेगळी भाषा. बाळ काहीतरी सतत बोलत असतं, पण त्याचा अर्थ कुणालाच कळत नाही. तिसरी पायरी त्या आवाजांना अर्थ मिळायला लागतो. “बाबा”, “मामा”, “आई” असे शब्द ओठांवर यायला लागतात. चौथी पायरी घरातले लोकच शब्द ओठांवर आणायला शिकवतात. 

“काका म्हण…”

“आई म्हण…”

“मामा म्हण…”

पाचवी पायरी शब्द ओठांवर येतात, पण जीभेला अजून त्यांची सवय झालेली नसते. म्हणून ते बोबडे बोल असतात. आणि मग एक दिवस अशी वेळ येते, जेव्हा जीभ शब्दांशी मैत्री करते. आणि आपण व्यवस्थित बोलायला लागतो. सगळ्यांसोबत हे असंच घडतं. फक्त माझ्यासोबत थोडंसं वेगळं घडलं...

लोक ज्या पायरीला “बोबडे बोल” म्हणतात, त्या पायरीवर मी जरा जास्त काळ थांबलो. शब्द ओठांवर यायचे, पण जिभेवर मात्र हवे तसे उमटायचे नाहीत. आडनावाप्रमाणेच मी “बोबडे” बोलत राहिलो. आमच्या ग्रामीण भाषेत त्याला “तोतरे बोलणं” म्हणतात. सुरुवातीला आपण काही बोललो आणि समोरचा हसला, तर कुतूहल वाटतं. आपणही हसून घेतो. पण हळूहळू समजायला लागतं की लोक आपल्या बोलण्यावर नाही, तर आपण कसं  बोलतो यावर हसत आहेत. आणि मग नकळत मनात एक विचार घर करायला लागतो. “न बोललेलंच बरं…” कारण काही वेदना अशाही असतात, ज्या माणसाचा आवाजच हिरावून घेतात. त्यातलीच ही एक वेदना होती.

आई-वडील मात्र वेगळे असतात. आपल्या मुलाचं यश असो, किंवा अपयश... त्यांच्यासाठी ते मूलच महत्त्वाचं असतं. त्यांना आपल्या मुलाचं प्रत्येक छोटंसं पाऊलही कौतुकास्पद वाटतं. पण समाज तसा नसतो. समाजातली काही माणसं कायम वही आणि पेन घेऊन बसलेली असतात. कोणाला जास्त मार्क्स मिळाले तर “हुशार” शिक्का. कोणी नापास झाला तर “अपयशी” शिक्का. कोणी छान बोललं तर “टॅलेंटेड” आणि अडखळत बोललं तर “कमजोर”. लोकांना लेबल लावायला खूप आवडतं. माप काढायची ही जगाची रीतच आहे, पण एखाद्याच कौतुक करायला पण ह्यांना काहीतरी स्वार्थ हवा असतो.  असो, ते त्यांचं काम करत असतात. पण त्या सगळ्यात एक लहान मूल मात्र स्वतःचा आवाज शोधत असतं… या गोष्टी चा कुठ तरी विचार व्हावा एवढंच.

आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळा, पैठण मध्ये जाण्यापूर्वी माझी इयत्ता पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईसारवाडी मध्ये पूर्ण झाली होती. त्या वयात आपण काही बोललो आणि समोरचा हसला, तर त्यामागचं कारण समजत नव्हतं. उलट भारीच वाटायचं, की “आपण बोलतोय आणि लोक हसतायत!” त्यानंतर शाळा बदलली. नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन वर्ग, नवीन पुस्तकं, नवीन दप्तर, आणि त्यासोबतच काही नवीन स्वप्नंही. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांनी नाव विचारायला सुरुवात केली. मी मुद्दाम कुणालाच नाव सांगितलं नाही. वाटलं, “आजचा दिवस तरी जाऊ दे…” पण थोड्याच वेळात वर्गात शिक्षक आले. त्यांनी एक-एक मुलाला उभं करून स्वतःचं नाव सांगायला सांगितलं. मुलांपासून तर वाचलो होतो, पण आता सरांनीच उभं केलं होतं. मनात भीती होतीच. थरथरत मी नाव सांगितलं “किशोल…” आणि जी भीती मनात होती… तेच झालं. पूर्ण वर्ग हसायला लागला. त्या दिवशी पहिल्यांदा मनात ठरवलं  “आता कमीत कमी बोलायचं.” आणि "र" पासून सुरू होणारे, "र" मध्ये येणारे किंवा "र" वर संपणारे शब्द टाळायचे. पण काही गोष्टी लपवूनही लपत नाहीत. माझं तोतरे बोलणंही तसंच होतं. कोणी ना कोणी रोज यायचंच. “अरे, जिभेला हात लावून हे वाक्य बोल…” “हा शब्द म्हण…” “असं बोल, तसं बोल…” काही लोक खूप स्वच्छ आणि सुंदर बोलायचे. त्यांच्याकडे पाहून खरंच वाटायचं, की ते मला बोलायला शिकवत असतील. म्हणून मीही प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलेले शब्द बोलून दाखवायचो. पण माझं बोलणं संपल्यावर ते हसायचे आणि अजून चार जणांना बोलवून दाखवायचे. तेव्हा मात्र स्वतःचंच वाईट वाटायचं. त्या चार वर्षांत मी त्या शाळेत जणू तोंड शिवल्यासारखा वावरलो. घरच्यांनाही जाणवायला लागलं होतं, की मुलगा आधीपेक्षा जास्त शांत, जास्त घाबरट होत चाललाय. म्हणून पुन्हा शाळा बदलली. 

भीमाशंकर विद्यालय वाहेगाव मध्ये प्रवेश घेतला. आता मी माझ्या निकितादिदी सोबत आलो होतो. ती सोबत आहे आता सगळ चांगल होईल अस वाटल. पण ती माझ्या पेक्षा मोठी तिचा वर्ग वेगळा आणि माझा वर्ग वेगळा होतो. म्हणून  तिथेही पहिलाच दिवस तसाच होता. सरांनी नाव विचारलं, मी नाव सांगितलं आणि पुन्हा वर्ग हसला. वाईट वाटलं पण त्या वाईट वाटण्याचीही आता मनाला सवय झाली होती. हातावरच्या रेषेला आणि कपाळावरच्या दैवाला दोष देऊन काय होणार आपल्यातच दोष आहे. लोकांच ऐकुनच घ्यावं लागणार. म्हणून ते सगळं तिथेच सोडून द्यायला शिकलो. माणसं बोलून निघून जातात, आपल्याला स्वता:ला सवरता आलं पाहिजे. त्या वर्गात खूप हुशार मुलं होती. काहीजण इतकं सुंदर आणि स्पष्ट वाचन करायचे की त्यांना ऐकताना मला खूप आनंद व्हायचा. मी शांत बसून त्यांच्याकडे पाहत राहायचो आणि मनात एक छोटंसं स्वप्न तयार व्हायचं “एक दिवस मीही यांच्यासारखा वाचेन, यांच्यासारखा बोलायला शिकेन” त्याच काळात वर्गातली एक मुलगी सुप्रिया तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पहिली आली. शाळेत सगळ्या विद्यार्थ्यांसमोर तिचा सत्कार झाला. टाळ्यांचा आवाज संपूर्ण मैदानावर घुमत होता. त्या दिवशी तिचं भाषण ऐकताना माझ्या मनात एक आग पेटली होती. त्या दिवशी मी स्वतःशी पहिल्यांदा स्पष्ट बोललो “एक दिवस मीसुद्धा असंच भाषण देणार आणि तालुका स्तरावर पहिला येणार!” कदाचित त्या मुलीला कधीच कळालं नसेल तिने फक्त एक स्पर्धा जिंकली नव्हती, तर माझ्यासारख्या कितीतरी मुलांना मोठं स्वप्न पाहायची हिंमत दिली होती. मीही स्वप्न पाहिलं होतं, पण ते पूर्ण करायला ज्या वाटेने जावं लागणार होतं. त्या वाटेचं वळण अजूनही माझ्या जिभेला जमत नव्हतं.  

आता मी पुढंच पाऊल घ्यायचा निर्णय घेतला. आता जीभेला हव तस वळण घ्यायला लावायच एक दिवस वर्गात कोणत्या तरी महापुरुषाची जयंती साजरी होणार होती. म्हणून दोन मुलं वर्गात आली आणि म्हणाली, “ज्यांना भाषण करायचं आहे त्यांनी नाव द्या.” मलाही ती एक संधी वाटली. मनात कुठेतरी दडलेलं स्वप्न पुन्हा हलकंसं जागं झालं. मीही धाडस करून नाव सांगितलं. पण समोरून लगेच उत्तर आलं “आधी स्वतःचं नाव नीट बोलायला शिक… मग भाषणाचा विचार कर.” ते शब्द कानावर पडले, पण टोचले मात्र थेट मनात. त्या दिवशी पहिल्यांदा असं वाटलं “हे जग खूप विचित्र आहे. हेच जग माणसाला स्वप्न दाखवतं आणि हेच जग ती स्वप्नं हिसकावूनही घेतं.” मग मनात प्रश्न यायला लागले. 

हे जग समजून का सांगत नाही की कसं बोलायचं?
लोक कायम थट्टा-मस्करीचीच भाषा का बोलतात?
या जगाचं गणित इतकं कठीण का आहे?

प्रश्न खूप होते, पण त्यांना विचारायला माझ्याकडे शब्द नव्हते आणि जे शब्द होते. त्यांना अर्थ नव्हता. त्या गोष्टी सोडून देण्यातच शहाणपण मानल आणि सोडून देत राहिलो. असं करत करत पाचवीही रडत-पडत पूर्ण झाली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या. एक दिवस मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर मित्रांसोबत खेळत होतो. खेळता खेळता पुन्हा माझ्या बोलण्यावरून थट्टा सुरू झाली. पण त्यादिवशीचे शब्द वेगळे होते. ते शब्द न सांगितलेलेच बरे.  आतापर्यंत सहन केलेलं सगळं अचानक जड वाटायला लागलं. मी खेळ थांबवला आणि एका बाजूला जाऊन शांत बसलो. डोळ्यांत पाणी होतं. तेवढ्यात ऋषिकेश बोबडे माझा भाऊ, माझा मित्र तिथे आला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, “काय झालं?” त्याचा स्वभाव मला माहिती होता. म्हणून मी त्याला सगळं सांगितलं. पण त्याने माझ्यावर दया दाखवली नाही, सहानुभूतीही दिली नाही. कारण त्याला चांगलच कळत होत, की साथ द्यायची वेळ आली की ज्ञान दिलं जात नाही. आणि बुडणाऱ्याला आधी वाचवलं जातं, पोहायला नंतर शिकवलं जातं. त्याने फक्त एक वाक्य म्हटलं

“किशोर… ‘र’ वर फोकस कर. ‘र’ बोलताना जीभ व्हायब्रेट होते. त्या vibration वर लक्ष दे.”

काही झालं तरी चालेल पण सवयीचा आजार नको स्वतःलाचं समजावण्यासाठी नको ती कारण हजार या वाक्याप्रमाणेच मी ही ठरवल, की आता सवयीचा गुलाम बनायच नाही. त्या मुळे त्याच्या बोलण्यावर लक्ष देत तो जे सांगेल ते करत गेलो.  त्या दहा-पंधरा मिनिटांत त्याने माझ्याकडून हजार वेळा “र… र… र…” बोलून घेतलं. त्याने “काय झालं?” यापेक्षा आता पुढे काय सुधारायचं? यावर भर दिला. आणि पहिल्यांदाच मी माझं नाव “किशोल” नाही, तर स्पष्टपणे “किशोर” असं बोललो. तो फक्त एक शब्द नव्हता. तो माझ्या आयुष्यातला पहिला विजय होता. त्या दिवशी असं वाटलं, जणू मी ती शेवटीची पाचवी पायरी पार केली होती. शब्दांना अर्थ मिळाला होता. आणि मी स्वतःच्या आवाजावर उभा राहायला शिकलो होतो. त्या दिवसानंतर “र” ची भीती कायमची निघून गेली. आज आयुष्यात अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी मिळाल्या, पण खरं सांगायचं तर माझं पहिलं आणि सगळ्यात मोठं यश तेच होतं. आजही कधी कधी वाटतं, त्या दिवशी ऋषिकेश आला नसता, तर कदाचित आजही मी त्या जगाच्या अवघड गणितातच अडकून राहिलो असतो. 

आता माझ्या स्वप्नांच्या वाटेतला मोठा अडथळा दूर झाला होता. ज्या रस्त्यावरून मला चालायचं होतं, त्या रस्त्याच वळणं देखील आता माझ्या जीभेवर वळण घेत होत. शब्द आकार घेत होते आणि त्यांच्यासोबत मीही. आता आयुष्याचे खेळ पोकळ शब्दांच्या भपक्या सोडून जिंकता येणार नाहीत. त्यासाठी शब्दांच्या धारीपेक्षा कृतीचे वार करावे लागतात, हे कळायला लागल. पण एक गोष्ट अजून बाकी होती वाचन. कायम अपमान, थट्टा आणि निराशा मिळत गेली म्हणून मी वाचनापासूनच दूर गेलो होतो. स्वतःचं नाव सोडून दुसरं कोणतंही नाव नीट वाचता येत नव्हतं. तोपर्यंत वर्गातली बाकीचे मुलं खूप पुढे निघून गेली होती आणि मी कुठेतरी मागेच राहिलो होतो. पण आता मनात एक नवीन भावना जन्माला आली होती.  “आपल्याला व्यवस्थित बोलता येतंय म्हणजे आपण करू शकतो!” आणि तिथून पुन्हा सुरुवात झाली. सहावी-सातवीत असताना मी पुन्हा बाराखडीपासून सुरुवात केली. अगदी लहान मुलासारखी. सुरुवातीला माझा वेग खूप कमी होता. शब्द ओळखायला वेळ लागायचा. वाचताना अडखळायचो. पण मला माहिती होतं वेग वाढवायचा असेल, तर थांबून चालणार नाही. त्या प्रवासात माझ्या दीदीने मला खूप मदत केली. तिने माझा वेग वाढवला… आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास वाढवला. आणि मग, इयत्ता आठवीत असताना मी आयुष्यातलं पहिलं भाषण दिलं. जसं प्रत्येक मुलं सुरुवातीला भाषण देतात ना अगदी तसंच साधं भाषण होतं ते.

“आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे…”
इथून सुरुवात केली आणि
“माझे दोन शब्द ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद! जय भारत!”

इथपर्यंत पोहोचून थांबलो. कोणत्यातरी भाषणाच्या पुस्तकात वाचलेलं ते भाषण मी व्यासपीठावर जाऊन बोललो होतो.  पण त्या दिवशी माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट भाषण नव्हती, तर माझ्या बोलण्यावर कोणीच हसलं नाही ही होती. पहिल्यांदाच व्यासपीठावर उभं राहून मला स्वतःचा आवाज भीतीदायक वाटला नाही. वर्गात परत गेल्यानंतर आमचे वर्गशिक्षक शांताराम बच्छे सर यांनी माझं खूप कौतुक केलं. खरं तर माझ्यापेक्षा वर्गातली अनेक मुलं खूप छान बोलली होती. पण सर म्हणाले  “तुमच्या सगळ्यांची भाषणं छान झाली, पण किशोरचा आवाज भारी होता. किशोर, पुढच्या वेळी अजून तयारी कर. तू खूप भारी भाषण करू शकतोस.” त्या काही शब्दांनी माझ्या मनात इतकी ताकद निर्माण केली, की जणू कुणीतरी पहिल्यांदा माझ्या आवाजावर विश्वास ठेवला होता.

त्याच काळात सावजी मॅडम नावाच्या शिक्षिका होत्या. त्या आम्हाला त्यांच्या मोबाईलवर देशभक्तीची गाणी, प्रेरणादायी व्हिडिओ दाखवायच्या. त्या व्हिडिओंमधून त्या आम्हाला एक गोष्ट शिकवत होत्या “जग फक्त आपल्या गावापुरतं मर्यादित नाही. त्यापेक्षाही खूप मोठं आहे.” आणि मग माने सर, ते रोज वर्गात एक वाक्य म्हणायचे “झाकली मूठ सव्वा लाखाची.” ते म्हणायचे, “तुमच्यात क्षमता आहे. फक्त स्वतःवर काम करा, जग जिंकता येतं.” त्यांचे ते शब्द आजही मनावर कोरलेले आहेत. कारण काही शिक्षक फक्त विषय शिकवत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांना स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवतात.

पण खरं सांगायचं, तर मी जे पहिलं भाषण केलं होतं, ते काही फार भारी नव्हतं. मी बोललो होतो भारी, पण माझ्याकडे शब्द नव्हते. आवाज सापडला होता, पण त्या आवाजामागची भाषा अजून तयार होत होती. म्हणून त्या दिवसानंतर मी शब्द गोळा करायला सुरुवात केली. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये थोडं थोडं वाचायला लागलो. सुरुवातीला हळूहळू मग सवयीने. वाचन सुरू झालं. भाषणाच्या विषयांबद्दल फार माहिती नसायची, म्हणून मोबाईलवर शोधून त्या विषयात काय बोलायचं हे शोधायचो. कुणी कसं बोलतं, शब्द कसे वापरतात, वाक्य कसं बांधतात हे सगळं पाहत राहायचो. एक गोष्ट मात्र ठरली होती “आपल्याला आता बोलता येतंय. आवाज आहे, तर भाषण करायचंच!” कारण त्या काळात माझ्यासमोर अनेक उदाहरणं होती. नितीन बानुगडे पाटील असतील, विश्वास नांगरे पाटील असतील, किंवा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. या सगळ्या व्यक्तींनी आपल्या शब्दांच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर मोठी उंची गाठली होती. मग मीही माझ्या स्वप्नामागे लागलो. २४ तास मनात एकच गोष्ट असायची “एक दिवस मोठं भाषण करायचं. आणि विजयापर्यंत दुसऱ्या कोणत्याच विषयाला मनात जागा द्यायची नाही.” अशातच शाळेत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं निमंत्रण आलं. आणि त्या स्पर्धेसाठी माझ्या नावापुढे शिक्कामोर्तब झाली. पण त्याच दिवशी सहामाही परीक्षेचा निकालही लागला. मला कमी मार्क्स मिळाले होते. आईने सगळा दोष भाषणाला दिला. ती ठामपणे म्हणाली, “आजपासून भाषण वगैरे काही नाही. आता फक्त अभ्यास.” वाईट वाटलं करायचा, पण राग आला नाही. कारण जिच्यासाठी मी हे सगळं स्वप्न पाहत होतो, ती माझी आईच होती. फक्त एक गोष्ट तिला माहिती नव्हती. पहिलीत तिने ज्या आवाजाचा अभिमान केला होता, तो माझा नव्हता. मला फक्त एकदाच तिच्या चेहऱ्यावर तोच आनंद माझ्यासाठी पाहायचा होता. पण शेवटी ती आई होती. आणि मला असंही वाटत होतं “आईने काही सांगितलं आणि आपण ऐकलं नाही…” असं व्हायला नको. म्हणून मी ठरवलं आता भाषण नाही करायचं. स्पर्धेला फक्त एक दिवस बाकी होते. शाळेत परिपाठ सुरू असताना घनवट सर यांनी मला विचारलं, “किशोर, तयारी झाली आहे ना?” त्या क्षणी माझ्याकडे उत्तर नव्हतं. कारण मी कुणालातरी शब्द दिला होता, आणि तो शब्द मी मोडत होतो. मी काहीच बोललो नाही. फक्त डोळ्यांत पाणी आलं. तेव्हा घनवट सर आणि शांताराम बच्छे सर मला बाजूला घेऊन गेले. त्यांनी माझी समजूत काढली. सर म्हणाले, हे बघ किशोर, आयुष्यात एक वेळ अशीही येते. जेव्हा पुढे जाणं कठीण वाटतं मागे फिरणं अशक्य वाटतं आणि थांबून राहणं सर्वात मोठा धोका वाटतो. कदाचित तिथूनच आयुष्य बदलायला सुरुवात होते.

“ही स्पर्धा तुझं आयुष्य बदलवू शकते. तू आईचा शब्द मोडू शकत नसशील, तर आमचाही नको मोडूस. कोणालाही न सांगता आम्ही तुला स्पर्धेला घेऊन जाऊ.” आणि मग त्यांनी एक वाक्य म्हटलं, जे आजही विसरत नाही,

खर तर त्या दिवशी, मरून पडलेल्या स्वप्नांना अग्नी देऊन मोकळं व्हावं, की त्यांचं विष आपल्या शरीरात भिनू द्यावं, ह्या दोघांच्या सीमारेषेवर लाचारासारखा उभा मी होतो. स्वप्नं पाहू नयेत असं मी म्हणणार नाही, पण पाठ फिरवून पळायचं असेल तर स्वप्नं पाहू नयेत. उंचीला घाबरून प्रयत्न न करणाऱ्या सापळ्याकडे पाहून स्वप्नांनाही कदाचित हेच दुःख होत असेल, की आपण ह्यांच्या मनात घर केलं. 

माझ्या मनात हे विचार सुरू असतांनीच सर म्हणाले,  

“या संधीचं सोनं केलंस, तर आयुष्यच सोनं होईल, तुझ आयुष्य बदलून जाईल.”

त्या शब्दांनी पुन्हा आत्मविश्वास जागा झाला. आणि मग, घरी कोणालाही न सांगता मी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालो. ती माझ्या आयुष्यातली पहिली स्पर्धा होती. त्यामागे पहिलीत पाहिलेलं एक छोटंसं स्वप्न होतं.  त्या स्वप्नासाठी केलेला संघर्ष होता.  रडणं, पडणं, थट्टा, अपमान आणि पुन्हा उभं राहणं होतं. मी जीवाचं रान करून त्या स्पर्धेत बोललो. आणि शेवटी, नववीत असताना तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माझा ही पहिला नंबर आला. त्या दिवशी फक्त स्पर्धा जिंकली नव्हती. तर एका तोतऱ्या बोलणाऱ्या मुलाच्या शब्दाला अर्थपूर्ण रूप देऊन त्याला  पुनर्जन्म दिला होता. 

स्पर्धा संपल्यानंतर जेव्हा माझ्या हातात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि मानधन आलं, तेव्हा मन अक्षरशः भरून आलं. त्या एका क्षणी जणू पूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. पहिलीपासूनचे दिवस आठवले नाहीत, लोकांनी चिडवताना वापरलेले शब्द आठवले नाहीत. हसणारे चेहरे आठवले नाहीत.  पण आश्चर्य म्हणजे त्या क्षणी त्या सगळ्यांचा राग मनात नव्हता. आठवत होते तर फक्त माझ्यासोबत उभे राहिलेले लोक.

आठवला - पहिलीतला तो दिवस, जेव्हा आईने दुसऱ्याचा आवाज माझा समजून अभिमानाने ऐकला होता. 
आठवला - ऋषिकेश बोबडे ज्याने मला “र” म्हणायला शिकवलं.
आठवली - माझी दीदी जिने मला वाचन शिकवलं, वेग दिला.
आठवली - पाचवीत तालुक्यात पहिली आलेली ती मुलगी, जिने नकळत माझ्यात एक स्वप्न पेटवलं होतं.
आठवले - कौतुकाची थाप देणारे शिक्षक.
शांताराम बच्छे सर, घनवट सर आणि माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवणारी ती माणसं.

आयुष्यात ज्या गोष्टीचा मला कधीकाळी राग येत होता. त्याच गोष्टीमुळे आज मला सन्मान मिळत होता. हे समाधान शब्दांत मावणारं नव्हतं. पण खरं सांगायचं तर त्या दिवशीही मला पूर्ण समाधान मिळालं नव्हतं. कारण ती फक्त स्पर्धा जिंकण्याची गोष्ट नव्हती. तो माझ्या अस्तित्वाचा संघर्ष होता. कारण जिव्हारी लागलेला शब्दना ध्यानात ठेवायच असत. आणि घोळक्यात झालेला अपमान असा सहज विसरायचा नसतो. 

दीदीच्या मार्गदर्शनाखाली मी त्या मिळालेल्या मानधनातून आईसाठी एक साडी घेतली आणि उरलेले पैसे आप्पांच्या हातात ठेवले. ती माझ्या आयुष्यातली पहिली कमाई होती. आजही त्या स्पर्धेचे फोटो माझ्याकडे आहेत. पण त्या फोटोंमध्ये माझ्या चेहऱ्यावर किंचितही हसू नाही. कारण मला माहिती होतं, माझ्या हातातलं ते सन्मानचिन्ह मोठं नव्हतं, मोठे होते ते शब्द, ती वाक्यं, ते अपमान. ज्यांना पार करून मी त्या व्यासपीठापर्यंत पोहोचलो होतो. आणि कदाचित म्हणूनच, त्या दिवशी मी जिंकलो नव्हतो, तर फक्त त्या पाहिलीतल्या किशोरला हरू दिलं नाही, याचा पहिल्यांदाच अभिमान वाटत होता.

स्वप्न पूर्ण झालं होत, पण मनाच समाधान काही केल्या होत नव्हत. ज्या गोष्टीचं समाधान हव होतं, त्या दिशेने चालायला सुरुवात झाली होती. काही गोष्टी मिळाल्याही होत्या, पण मनाला अजून शांती मिळत नव्हती. कारण ज्या तीक्ष्ण शब्दांनी मी आतून जखमी झालो होतो. त्यांचे आवाज अजूनही कानात घुमत होते. मग ठरवलं, हा प्रवास एवढावरच थांबवायचा नाही.

दहावीत असताना स्वामी बोबडे, मंगेश बनसोडे, लखण बोरूडे आणि योगेश गायके यांच्या सोबत मिळून मीही  एक वेगळा निर्णय घेतला. महापुरुषांच्या जयंती फक्त DJ लावून, नाचून साजऱ्या करायच्या नाहीत, तर त्यांच्या विचारांचा जागर करून साजऱ्या करायच्या. आणि मग आम्ही गावोगावी व्याख्यानांचं आयोजन करायला सुरुवात केली. कधी छोट्या गावात, कधी एखाद्या चौकात, कधी मंदिरासमोर, तर कधी शाळेच्या मैदानात, आम्ही बोलत राहिलो. एकदा निलजगावमध्ये व्याख्यान सुरू असताना मध्येच अजान सुरू झाली. मी लगेच थांबलो. अजान पूर्ण होईपर्यंत शांत उभा राहिलो. दुसऱ्या वेळी वाहेगावमध्ये भाषण करत असताना मंदिरात आरती सुरू झाली. त्या वेळीही मी भाषण थांबवलं आणि आरती संपेपर्यंत वाट पाहिली. त्या घटनांमुळे पहिल्यांदाच माझं नाव वर्तमानपत्रात छापून आलं होतं. त्यात आमच्या सगळ्यांची नावं होती. आणि पुढे लिहिलं होतं “द रियल हिरो.” त्या शब्दांचा अर्थ त्या वेळी पूर्णपणे समजला नव्हता. पण काही दिवसांनी तो अर्थ आयुष्यानेच समजावून सांगितला. शाळेत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा आयोजित केली होती. अनेक मुलांनी नावं दिली होती. एकामागोमाग एक भाषणं सुरू होती. मध्येच अक्षय नावाच्या मुलाचे आई-वडील आले. तो त्यांना भेटण्यासाठी शाळेच्या मुख्य गेटकडे गेला. तेवढ्यात माझ्या भाषणाची घोषणा झाली “यानंतर किशोर बोबडे भाषण करेल.” अक्षय अजून आई-वडिलांना भेटलाही नव्हता. तो दूरूनच हात वर करून “थांबा…” असा इशारा करत धावत येताना दिसला. आणि त्या क्षणी, मी भाषण सुरू केलं नाही. तो येईपर्यंत मी शांत उभा राहिलो. तो धावत आला, बसला, आणि मग मी भाषण सुरू केलं. त्या दिवशी मला “द रियल हिरो” या शब्दांचा खरा अर्थ समजला. अजान सुरू झाली म्हणून थांबलो, आरती सुरू झाली म्हणून थांबलो, तेव्हा मला फक्त माझा धर्माविषयीचा आदर वाटला होता. पण त्या दिवशी एका मुलासाठी थांबलो, कारण मला माहिती होतं. कुणाचं बोलणं ऐकायची इच्छा असणं, आणि त्या क्षणी कुणीतरी आपल्यासाठी थांबणं. ही खूप मोठी गोष्ट असते. कदाचित म्हणूनच त्या दिवशी पहिल्यांदा वाटलं भाषण म्हणजे फक्त शब्द नसतात, तर समोरच्या माणसाच्या भावनांचा आदर करणंही असतं.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दिवशी अनेक मुलं उपस्थित होती, पण मुलांमधून भाषण करण्यासाठी मी एकटाच उभा राहिलो होतो. मी मनापासून सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषण केलं. भाषण संपल्यानंतर पारधी मॅडम व्यासपीठावर आल्या आणि बोलताना त्यांनी एक वाक्य म्हटलं “आज इथे सावित्रीबाईंवर बोलणारा एकच ‘सावित्रीचा लेक’ उभा होता.” त्या क्षणी मिळालेलं ते वाक्य माझ्यासाठी आभाळाएवढ मोठं होतं.

“सावित्रीचा लेक…”

हे फक्त कौतुक नव्हतं, तर ती एक जबाबदारी होती. विचारांची, शिक्षणाची, आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची. आजही मी त्या एका वाक्याल्या योग्य ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. कार्यक्रम संपल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका भागवत मॅडम तिथे आल्या. त्यांच्या हस्ते मला बक्षीस देण्यात आलं. मनोगत व्यक्त करताना त्या एक वाक्य बोलल्या, जे आजही मनात खोलवर कोरलं गेलं आहे. “आज मला उशिरा आल्याचा पश्चाताप होतोय, कारण मला किशोरचं भाषण ऐकता आलं नाही.” त्या क्षणी मला जाणवलं, काही लोक आपल्याला फक्त टाळ्या देत नाहीत, तर ते आपल्या शब्दांवर विश्वास ठेवतात. माझ्या आयुष्यात अशी अनेक माणसं भेटली, ज्यांनी कळत-नकळत माझ्यावर विश्वास ठेवला, मला प्रोत्साहन दिलं, आणि पुढे चालत राहण्याची ताकद दिली. त्यांनी बोललेली ती छोटी-मोठी वाक्यं कदाचित त्यांच्यासाठी साधी असतील पण माझ्यासाठी मात्र ती आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कारण कधी कधी एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर असलेला विश्वास, आपल्यालाच स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवत असतो.

त्याच काळात माझी भेट दिनेश औटी सर यांच्याशी झाली. शिक्षक म्हणून त्यांना आधीपासून ओळखत होतो. पण त्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक नवीन ओळख झाली, एक प्रभावी वक्ता म्हणून. त्यांनी मला वकृत्व म्हणजे नेमकं काय असतं हे समजावून सांगितलं. भाषण फक्त जोरात बोलणं नसतं, ते कसं असलं पाहिजे, लोकांसमोर कसं मांडलं पाहिजे, आणि त्यातून लोकांनी काय घेऊन जावं. हे त्यांनी शिकवलं. त्या काळात माझी एक वेगळीच सवय होती. मी YouTube वर मोठ्या वक्त्यांची भाषणं पाहायचो, आणि ती जशीच्या तशी बोलण्याचा प्रयत्न करायचो. त्यांचा आवाज, त्यांची शैली, त्यांचे Pauses सगळं अनुकरण करायचो. एक दिवस सरांनी मला शांतपणे सांगितलं “किशोर, मीही एकेकाळी तुझ्यासारखाच होतो. मी राजसाहेब ठाकरे यांच्या शैलीत बोलायचो. इतकं की लोक मला ‘राजसाहेब ठाकरे’ म्हणूनच ओळखू लागले होते.” राजसाहेब ठाकरे यांचं नाव घेत त्यांनी पुढे सांगितलं “पण एक वेळ अशी आली, जेव्हा मला समजलं दुसऱ्याची शैली उधार घेऊन ओळख तयार होत नाही. मग मी ती ओळख पुसून टाकली, आणि माझ्या स्वतःच्या शैलीत बोलायला सुरुवात केली. आज लोक मला माझ्या वकृत्वामुळे ओळखतात.” मग त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटलं “आज लोक तुला ‘नितीन बानगुडे पाटील’ म्हणतात. पण एक दिवस असा येऊ दे, की लोक दुसऱ्यांची तुलना तुझ्याशी करतील. तुझ्या स्वतःच्या शैलीत बोल, तुझ्या वकृत्वातून तुझी नवीन ओळख निर्माण कर.” त्या शब्दांनी माझ्या विचारांची दिशा बदलली. पहिल्यांदा जाणवलं वक्ता होणं म्हणजे कुणासारखं बोलणं नाही, तर स्वतःचा आवाज आणि विचार शोधणं असतं. आणि त्याच काळात जगभर COVID-19 पसरला. सगळं थांबलं, पण माझ्यासाठी तो काळ थांबण्याचा नव्हता, स्वतःवर काम करण्याचा होता. त्या काळात मी स्वतःला पुस्तकांमध्ये झोकून दिलं. रामायण, महाभारत, छावा, मृत्युंजय यांसारखी अनेक पुस्तकं वाचली. न्यूज पेपर वाचले, मुलाखती पाहिल्या, लोक कसे बोलतात, कसे विचार करतात, शब्द कसे वापरतात हे समजून घ्यायला सुरुवात केली. आता फक्त बोलायचं नव्हतं, तर स्वतःच्या शैलीत उभं राहायचं होतं. आणि कदाचित, त्या काळात मी फक्त भाषण शिकत नव्हतो, तर स्वतःला घडवत होतो. 

पुढील शिक्षणासाठी मी न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर मध्ये प्रवेश घेतला. नवीन कॉलेज, नवीन वातावरण, नवीन माणसं पण या वेळी माझ्यासोबत एक गोष्ट नवीन नव्हती, माझं स्वप्न. कॉलेजमध्ये गेल्यानंतर अवघ्या एका महिन्यात मला कै. ह. तृ. तथा बाळासाहेब काळे स्मृतीकरंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.  मी व्यासपीठावर उभा राहिलो आणि त्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. त्या दिवशी खूप लोक आनंदी होते. माझं अभिनंदन करत होते. पण काही चेहऱ्यांवर मात्र निराशा दिसत होती. आणि खरं सांगायचं, तर त्या निराश चेहऱ्यांकडे पाहून मला “मी पहिला आलो” याचं फारसं कुतूहलच वाटलं नाही. कारण आयुष्याने मला एक गोष्ट आधीच शिकवली होती. जिंकण्याचा आनंद मोठा असतो. पण आपल्या जिंकण्यामुळे कुणाला कमी वाटू नये, ही भावना त्याहून मोठी असते. त्याच महिन्यात, अवघ्या पंधरा दिवसांनी सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. या वेळी मी पूर्ण तयारीनिशी उभा राहिलो. पण या वेळी माझं लक्ष फक्त जिंकण्यावर नव्हतं, तर एक गोष्ट मनात होती “या वेळी कुणी निराश होऊ नये.” मी खूप अभ्यासपूर्वक विषय मांडला. शब्द, उदाहरणं, भावना, आवाज सगळं मनापासून दिलं. विषय इतका प्रभावी झाला की भाषण संपायच्या आधीपासूनच अनेक जण येऊन अभिनंदन करू लागले. प्रत्येकाला वाटत होतं “याचाच पहिला नंबर येणार.” निकाल जाहीर करण्याची वेळ आली. “प्रथम क्रमांक जात आहे…” असं म्हणताच संपूर्ण हॉल माझ्याकडे पाहू लागला. पण माझं नाव आलंच नाही. “द्वितीय क्रमांक…” तरीही माझं नाव नाही. आणि मग, “तृतीय क्रमांक…” त्या वेळी माझं नाव घोषित झालं. क्षणभर संपूर्ण हॉल शांत झाला. लोकांच्या चेहऱ्यावर निराशा होती. पण या वेळी त्या निराशेचं कारण वेगळं होतं. त्यांना वाटत होतं “हा पहिला यायला हवा होता.” आणि त्या दिवशी, पहिल्यांदाच मला पूर्ण समाधान मिळालं. कारण त्या वेळी मी फक्त स्पर्धा जिंकत नव्हतो. तर लोकांच्या मनात जागा बनवत होतो. यानंतर अशाच अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होत गेलो. काही जिंकलो, काही हरलो पण प्रत्येक व्यासपीठाने मला एक नवीन गोष्ट शिकवली वक्ता तोच मोठा नसतो, ज्याला पारितोषिक मिळतं, तर तो मोठा असतो, ज्याचं बोलणं लोकांच्या मनात स्पर्धा संपल्यानंतरही जिवंत राहतं. 

पुढील काहीकाळात मी खालील वक्तृत्व स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलं.

  • श्री संत एकनाथ विद्यालय, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक.
  • न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे आयोजित कै. ह. तृ. तथा बाळासाहेब काळे स्मृतीकरंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक.
  • न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे आयोजित कॉम्रेड एकनाथराव भागवत  स्मृतीकरंडक आंतरविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
  • सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक.
  • हुतात्मा राजगुरू विचार मंच आयोजित भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा “वक्ता महाराष्ट्राचा” मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक.
  • ठरवल की सगळ होत फक्त, माणूस जिद्दीला पेटलेला लागतो. त्या इवल्याशा डोळ्यांनी पहिलीत पाहिलेलं ते छोटंसं स्वप्न पूर्ण करायला मला तब्बल चौदा वर्षे लागली. तो माझ्या आयुष्यातला चौदा वर्षांचा वनवास होता. या चौदा वर्षांत मी फक्त बोलायला शिकलो नाही, तर अपमान गिळायला शिकलो, शांत राहायला शिकलो, स्वतःशी लढायला शिकलो, आणि पुन्हा पुन्हा तुटूनही उभं राहायला शिकलो. या प्रवासात खूप काही मिळालं, खूप काही हरवलं, पण शेवटी मनाला हवं होतं ते समाधान ही मिळालं. आज माझ्याकडे राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये मिळालेले प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची पारितोषिकं आहेत, उत्तेजनार्थ पारितोषिकं, आणि इतर छोट्या स्पर्धांमध्ये मिळालेले पारितोषिकं सोबतच असंख्य सहभागी प्रमाणपत्रं आहेत. पण खरं सांगायचं तर, ते स्वप्न तर त्या दिवशीच पूर्ण झालं होतं, ज्या दिवशी मी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो होतो. फक्त त्या स्वप्नापर्यंत पोहोचायला नऊ वर्षं लागली, आणि त्या नऊ वर्षांत आयुष्याने माझ्याकडून खूप मोठं व्याज घेतलं होतं. लोकांच्या हसण्याचं व्याज, अपमानाचं व्याज, शब्द अडकल्याचं व्याज, स्वतःचं नाव बोलताना घाबरण्याचं व्याज आणि कदाचित म्हणूनच पुढे मिळालेलं प्रत्येक राज्यस्तरीय पारितोषिक मला फक्त “यश” वाटलं नाही, तर त्या व्याजाची केलेली परतफेड वाटली. कारण चौदा वर्षं, माझी आई एका खोट्या आनंदात जगत होती. एका गोड गैरसमजात खुश होती. पहिलीत तिने ऐकलेला तो आवाज माझा नव्हता, पण त्या गैरसमजाला सत्यात उतरवायचं होतं. आणि कदाचित, माझा पूर्ण प्रवास फक्त त्यासाठीच होता.

    दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये मिळालेली सगळी सन्मानचिन्हं, पारितोषिकं, प्रमाणपत्रं आणि मानधन घेऊन मी घरी आलो. पण त्या दिवशी मी फक्त स्पर्धा जिंकून घरी परतलो नव्हतो, तर पहिलीत अपूर्ण राहिलेलं एक स्वप्न पूर्ण करून आलो होतो. “आईने अभिमानाने ऐकलेला आवाज एक दिवस खरोखर माझाच असावा.” त्या एका स्वप्नासाठी मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या कमकुवतपणालाच माझी ताकद बनवावं लागलं. घरात प्रवेश करताच मी ती सगळी सन्मानचिन्हं आणि प्रमाणपत्रं आईच्या चरणांशी ठेवली. आणि पहिल्यांदाच तिला शांतपणे सगळं खरं सांगितलं,

    “आई…

    पहिलीत तू जो भाषणाचा आवाज ऐकला होतास ना… तो माझा नव्हता. आज तुझ्यासमोर जो उभा आहे ना... तो खरा मी आहे. त्या दिवशी तुला खूप आनंद झाला होता, पण मला मात्र नाही. कारण माझ्या मनाला माहिती होतं तो मुलगा मी नव्हतो. मलाही तो आनंद अनुभवायचा होता. आणि तुलाही तो आनंद खऱ्या अर्थाने द्यायचा होता. म्हणून हा सगळा अट्टाहास…”

    K.G.F मध्ये रॉकीला त्याच्या आईने एक वचन दिलं होतं “मोठा माणूस बन आणि जगातल सगळ सोन मिळव” पण माझी गोष्ट थोडी वेगळी होती. माझ्या आईने मला कधीच मोठं हो असं सांगितलं नव्हतं.  किंवा कुठल वचन दिल नाही. मी स्वतःच तिच्या चेहऱ्यावरचा तो अभिमान पाहिला होता. आणि स्वतःलाच एक वचन दिलं होतं “एक दिवस हा आवाज खरोखर माझाच असेल.” काही लोकांना स्वप्नं दिली जातात, आणि काही लोक स्वतःच्या जखमांमधून स्वप्नं जन्माला घालतात. मी दुसऱ्या प्रकारातला होतो. कारण एका आईसाठी मुलाचा आत्मविश्वास हा जगातल्या कोणत्याही सोन्यापेक्षा मोठा असतो. आणि म्हणून, त्या दिवशी ती सन्मानचिन्हं, ती पारितोषिकं, ती प्रमाणपत्रं माझ्यासाठी फक्त यश नव्हती, तर ती चौदा वर्षांच्या संघर्षानंतर आईच्या डोळ्यांत परत आणलेली तीच पहिलीतली चमक होती. आईला स्वतःलाही माहिती नसतं, पण घरातल्या प्रत्येक सणाची खरी रौनक तीच असते. काही कथा पडद्यावर नाही, तर आयुष्यात घडतात, आणि त्या एखाद्या सिनेमालाही लाजवून जातात. त्या दिवाळीत मी फक्त देव घरातल्या लक्ष्मीच पूजन केलं नाही, तर माझ्या घरच्या खऱ्या लक्ष्मीचं अर्थातच माझ्या आईचं माझ्या शब्दांनी, माझ्या संघर्षाने आणि माझ्या यशाने पूजन केलं... 

    प्रिय आई,
    लहानपणी तू एक आवाज माझा समजून आनंदी झाली होतीस आणि कदाचित त्या दिवसापासून मी स्वतःलाच एक वचन दिलं होतं “एक दिवस हा आवाज खरोखर माझाच असेल.” आई इथपर्यंत येईपर्यंत खूप त्रास झाला. खूप काही सहन करावं लागलं, पण कधीच कोणासमोर डोळ्यातल पाणी येऊ दिलं नाही. जे काय आलं ते तुझ्या समोरच आलं. हा लेख किंवा माझा हा प्रवास फक्त एक वक्ता म्हणून उभं राहण्याचा नव्हता, तर आई, तुझ्या त्या पहिलीतल्या आनंदापर्यंत पुन्हा पोहोचण्याचा. आणि त्या भावनेला पुन्हा एकदा स्पर्श करण्याचा माझा चौदा वर्षांचा प्रयत्न होता.
    आई, आज मातृदिना निमित्त (Mother’s Day Special)…
    माझ्या आयुष्यातील सर्वात जिव्हाळ्याचा प्रवास, आणि सोबतच माझ्या आयुष्यातलं हे मोठं लिखाण. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीला अर्थात तुझ्या पायावर पुन्हा समर्पित करतोय…


    हा फक्त प्रवासाचा भाग-१ :- एका आवाजाचा, एका स्वप्नाचा आणि आईच्या अभिमानासाठी केलेल्या संघर्षाचा. हा फक्त एक धरार होतो. हा प्रवास सुरू असतानाच ह्या सगळ्यावर एक ठिणगी पडली होती.. खरा वणवा अजून बाकी आहे.
    भाग- २ लवकरच…

    Comments

    Swami Bobade said…
    किती छान !!!! वक्तृत्वाचा वारसा जप . लोकांना आवडेल म्हणून नाही ; लोकांच्या हिताचे बोल.
    Anonymous said…
    शाळेत असताना तुझ्या भाषणाची नेहमीच उत्सुकता असायची.... विशेष म्हणजे तू माझा competetor असायचास but honestly...Instead of feeling bad that I always come second because of you, I used to feel happier that you came first.... कारण तुला ऐकून वाटायचं की u always deserve it ... तुझी वक्तृत्वाची शैली,समोरच्याला प्रभावित करणारा आवाज आणि आवाजात असलेला आत्मविश्वास ...अप्रतिम!
    खरं तर तेव्हा तुला व्यासपीठावर वर बोलताना बघून ठामपणे बोलण्याचा आत्मविश्वास माझ्यामध्ये वाढला ....त्यामुळे thanks to u, too!😊
    Anonymous said…
    ल ते र हा प्रवास खरच सोपा नव्हता, पण तुझी जिद्द आणि चिकाटी सगळ्या अडथळ्यांना पार करून एक चांगला वक्ता घडवत गेली... तुझ्या शब्दांना धार आहे....
    Anonymous said…
    प्रिय किशोर, तू खूप छान लिहिलेस, तसा खूप छान बोलतो सुद्धा. असंच यश संपादन करत जा आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच.
    Anonymous said…
    मस्त लिहितोस रे 😊 . पूर्ण ब्लॉग मनापासून वाचला... खूप अभिमान वाटला तुझा. असाच आयुष्यात पुढे जात रहा... एक दिवस नक्कीच यशाच्या उंच शिखरावर असशील. आणि एक ग्रेटेस्ट लेखक म्हणून पण ओळखल्या जाशील....😊 Best of luck brother.
    Anonymous said…
    किशोर...मी सुप्रिया
    खरं सांगायचं तर…
    त्या काळात माझ्या एका छोट्याशा यशामुळे कुणाच्या मनात इतकं मोठं स्वप्न जन्माला येईल, याची मला कल्पनाही नव्हती.
    आज तुझा हा प्रवास वाचताना अभिमान वाटतोय. कारण तू फक्त स्पर्धा जिंकला नाहीस तर स्वतःच्या आवाजावर, स्वतःच्या अस्तित्वावर विजय मिळवलास. काही लोक नकळत प्रेरणा देऊन जातात म्हणतातपण त्या प्रेरणेला चौदा वर्ष जपून ठेवत इतिहास बनवणारे फार कमी असतात. तुझ्या या प्रवासाला मनापासून सलाम…
    Anonymous said…
    Bhag 2 Chi Pratiksha rahil..❤️
    Anonymous said…
    This wasn't just a blog post it is truly inspiring !....Dada tujya pratek blog madhe ek veglich Inspiration aste.. Keep it up...!👌🏻👌🏻🙏🏻
    Anonymous said…
    मी तुझा ब्लॉग सगळा वाचला ... आता मी वेळ काढून ऑफिस च काम सोडून वाचलं😅वाचताना अनेकदा असं वाटलं,की माझ्याच आयुष्याचे काही तुकडे त्या शब्दांत सापडले😢वाचताना वेळ कधी गेला कळलंच नाही…
    हेच तर खरं सुंदर लेखन आहे 👍🤩Keep It Up ....
    Anonymous said…
    Bhawa KGF movie aata paryant avdicha hota...aata nahhi
    Kishor Bobade said…
    तुम्ही सगळ्यांनी माझ्या आयुष्यातल्या सर्वात जिव्हाळ्याच्या प्रवासाला वेळ देऊन वाचलं आणि त्या प्रवासाचे साक्षीदार झालात, यासाठी मनापासून धन्यवाद…❤️
    तुम्ही दिलेल्या शुभेच्छा, प्रतिक्रिया आणि प्रेम माझ्या पुढील प्रवासात मला नक्कीच ताकद देतील, यात मुळीच शंका नाही.

    प्रिय competitor…❤️
    तू मला कळत-नकळत खूप काही शिकवून गेलीस.
    तुला आठवतंय…?
    मी नववीत होतो आणि तू आठवीत. तुझी शाळा दुपारी १२ ते ५ आणि माझी सकाळी ७ ते १२. शिवजयंती निमित्त शाळेत भाषण स्पर्धा आयोजित केली होती. माझं भाषण ऐकायचं म्हणून तू आणि तुझ्या मैत्रिणी तब्बल दोन तास आधी शाळेत आलात आणि सकाळच्या सत्रातील मुलांमध्ये येऊन उभ्या राहिलात. तू माझं भाषण इतक्या मन लावून ऐकलंस आणि भाषण संपल्यानंतर माझ्याकडे येऊन फक्त एवढंच म्हणालीस “किशोर, तू खूप छान बोललास, आम्ही खास तुझं भाषण ऐकायला लवकर आलो होतो.”
    त्या दिवशी तुम्ही मला एक वेगळीच उभारी दिली होती. आणि कदाचित त्याच उभारीला सार्थ ठरवण्यासाठी मी पुढे सतत धडपडत राहिलो.
    खरं सांगायचं तर, मला सगळं कळत होतं. तू नेहमी स्पर्धेत दुसरी यायचीस. माझ्यासारखीच तूही खूप तयारी करून बोलायचीस. मलाही माहिती होतं, तुला ही पहिल यायचं होतं. त्या मागे तुझंसुद्धा स्वप्न होतंच.
    But still, you always chose appreciation over jealousy, and that is something truly rare.
    मी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो, तेव्हा विद्यार्थ्यांमधून फक्त तू माझ्याकडे आलीस आणि म्हणालीस “किशोर, मनापासून अभिनंदन… खरंच खूप भारी वाटलं तू पहिला आलास म्हणून.”
    त्या दिवशी तू मला एक आरसा दाखवला होता, की माणूस किती नम्र असावा. ज्याच्या मुळे आपण एक पाऊल मागे राहतोय, त्याच्याच यशात मनापासून आनंद मानणं या साठी फार मोठं मन लागतं. आणि आजही तु तेच करत आहेस.
    त्या वेळी माझ्याकडे तुला Thank You म्हणण्यासाठीही शब्द नव्हते. मी काहीच न बोलता तसाच निघून गेलो. पण आज माझ्या अंगी जो काही नम्रपणा आहे ना, तो मी तुझ्या त्या मनाच्या मोठेपणातूनच शिकलेला आहे. या सगळ्यासाठी मी नेहमी तुझा ऋणी राहीन.
    मनापासून आभार आणि धन्यवाद…❤️
    खरंच तू एक सावित्रीचा लेक आहेस असं म्हणायला हरकत नाही, तुझ्या लिखाणा मध्ये जेव्हढी स्पष्टता आहे तेव्हढीच तुझ्या कॅरेक्टर मध्ये पण.... तुझा एक एक लिहिलेला शब्द वाचताना जिवंत वाटत होता.... खरंच खूप खूप छान आणि योग्य पद्धतीने तू तुझ्या आणि तुझ्या आई प्रति असलेल्या भावना मांडल्या...आपण आपले भावना मांडताना त्या कोणाच्या जिव्हारी लागणार नाही याची जाणीव तुला आहे हे मला वाचताना जाणवलं....keep it up किशोर
    Anonymous said…
    खूपच छान...अप्रतिम लिहिलंस किशोर. या काटेरी वाटेवरून केलेला प्रवास आपले वर्तमान व भविष्य सुकर करते. त्याचाच अनुभव तू घेतलास. तुला अनेक लोक असुयेने किंवा अज्ञानाने तुझ्याविषयी बोलणारे तुझ्याविरुद्ध वागणारे भेटले. पण, तू त्याच्या विरुद्ध उभा न राहता तू स्वतःच्या बाजूने उभा राहिलास आणि जिंकलास.
    हे केवळ जिंकणे नव्हते तर आईच्या स्वप्नासाठी जगणे होते. त्यामुळेच तू योग्य मार्गाने चालत राहिलास...आईच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याच्या ध्यासाने पछाडलेले मूल कधीही भरकटू शकत नाही, चुकू शकत नाही. याचे उदाहरण म्हणून माझ्यासमोर तू आहेस.
    असेच लिहित रहा..खूप शुभेच्छा किशोर!😊🍫

    Popular posts from this blog

    स्वतःला ओळखण्याचा प्रवास हा कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो.

    प्रिय गायत्रीस्...❤️