कधी कधी वाटतं, माणसं जितकी भेटत नाहीत, त्यापेक्षा जास्त पुस्तकं भेटतात. काही पुस्तकं विचार देतात, काही जखमा भरतात. आणि काही पुस्तकं शांतपणे आपल्याला नव्याने घडवत राहतात.
पुस्तकं सांगतात कथा
पुस्तकं मांडतात व्यथा
पुस्तकं जाणतात गाथा
भल्याबु-ऱ्या माणसांची
पुस्तकं चितारतात युद्ध
पुस्तकं समजावतात बुद्ध
पुस्तकंच करतात समृद्ध
भल्याबु-ऱ्या माणसास
वाचता वाचता शब्दांचा
हा असा पाडतात पाऊस
हसवतात रडवतात
त्यातून घडवतात माणूस ....
वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम्।वार्धके दुःखहरणं हितं सद्ग्रन्थवाचनम्।।
लहानपणी 'वाचन' ज्ञानदायक असते, तर तारुण्यात चारित्र्याचे रक्षण करते, आणि म्हातारपणी दुःख दूर करते. म्हणून चांगल्या ग्रंथांचे नेहमी वाचन केले पाहिजे. वाचन ही लेखणीची जननी आहे, कारण काहीतरी लिहिण्याआधी काहीतरी वाचन गरजेचं असतं.
पुस्तक वाचण्याचा छंद आपल्याला एकाच आयुष्यात हजार आयुष्य जगण्याचा अनुभव देतो, आणि सर्वांगाने समृद्ध करतो. समृद्धीकडे जाण्याची ही वाटचाल सुखकर होण्यासाठी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर जि.अहिल्यानगर येथे “ग्रंथदिंडी” हा अनोखा उपक्रम साजरी करण्यात आला आहे. ग्रामीण भागात, विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये वाचनाची संस्कृती टिकून ठेवण्यासाठी सर्व धर्माच्या महानग्रंथांचं व भारतीय संविधान यांसारख्या ग्रंथांचा, पुस्तकांचा जागर पारनेरमध्ये ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून केला आहे. पुस्तकांचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाचनामुळे माणूस सजग बनतो. मानवी स्वभावामध्ये सुजनशीलता वृद्धिंगत होते.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आज "पुस्तकांचं गाव" या नावाने ओळखले जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात असलेल्या भिलार या गावात 35 घरांमध्ये वाचकांना व पर्यटकांना मोफत सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिलेली आहेत, "वाचा आणि पुन्हा ठेऊन द्या" या तत्वावर वाचकांना ती पुस्तके कोणाच्याही परवानगीशिवाय स्वतः निवडून वाचता येतात. अशा संकल्पना खर तर प्रत्येक गावागावात राबवणे गरजेचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, की पुस्तक वाचल्याने मस्तक तयार होते आणि तयार झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही. पुढे असे म्हणतात, की तुमच्याकडे जर दोन रुपये असतील, तर तुम्ही एक रुपयाची भाकरी घ्या, आणि एक रुपयाचं पुस्तकं घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तकं तुम्हाला जगायचं कसं ते शिकवेल. एक लेखक असं म्हणतात की "पुस्तक न वाचणारी माणस तिरडीवर ठेवलेल्या प्रेतासारखे असतात." एक प्रख्यातत्त्वज्ञ आनंद देसाई वृध्दापकाळामध्ये पुस्तक उचलत नाही, म्हणून पुस्तकाची पाने फाडून ती हातात धरून वाचत असतात, तर लक्ष्मण शास्त्री जोशी वयाच्या 90 व्या वर्षीही वाचन केल्याशिवाय झोपत नसत. देशाचा सर्वोच्च नागरिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती भवनासारख्या वैभवशाली वास्तूमधून बाहेर पडत होते. मागे राहिलं होतं सामर्थ्य, सत्ता, शासकीय ताफे आणि प्रोटोकॉल तेव्हा त्यांच्या जवळ संपत्ती नव्हती, सत्ता नव्हती, वैभव नव्हतं, डॉ. कलाम यांच्या जवळ जर काही सर्वात मौल्यवान होतं, तर ती पुस्तकं होती. कारण ज्याने आयुष्यभर पुस्तकांना जवळ ठेवलं, त्याला जगाने कायम डोक्यावर घेतलं. अशा प्रकारे वाचनाच्या तपश्चर्येमुळे ही माणसं विद्वान आणि अजरामर झाली.
अमर मोराळे "वाचन" या विषयावर बोलत असताना असं म्हणतात, की “वाचन हे एक पेरण असत, तर लिहिणं म्हणजे उगवण उगवण्याची चिंता करत बसण्यापेक्षा पेरणीला सुरुवात करा. एक दिवस तुमच्या शेतात उगवलेले धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील”.
आज माणूस जगाशी खूप जोडला गेलाय, पण स्वतःपासून मात्र दूर जात चाललाय. एका हातात संपूर्ण जग आणणारा मोबाईल आहे, पण त्याच हातात स्वतःला शोधून देणारं पुस्तक उरलेलं नाही. पूर्वी घरामध्ये माणसं बोलायची. आता Notifications बोलतात. पूर्वी नात्यांमध्ये संवाद होता. आता फक्त online उपस्थिती उरली आहे. पूर्वी रात्री गोष्टी ऐकताना माणसं झोपायची. आता स्क्रीन बघता बघता नाती झोपत चालली आहेत. एकाच घरात राहूनही आज प्रत्येकजण स्वतःच्या स्क्रीनमध्ये कैद झालाय. डोळे सतत जागे असतात, पण मनं मात्र हळूहळू झोपत चालली आहेत. म्हणूनच पुस्तकांची गरज आज जास्त आहे. कारण पुस्तकं आपल्याला जगाची माहिती देत नाहीत, तर ती स्वतःकडे बघायला शिकवतात. काही पुस्तकं शांतपणे आपल्या खांद्यावर हात ठेवतात. काही पुस्तकं आयुष्यभर न विचारलेले प्रश्न विचारतात. कधी कधी एका पुस्तकात सापडलेलं एक वाक्य संपूर्ण आयुष्याचा अर्थ बदलून टाकतं. आणि काही पुस्तकं आपल्याला पुन्हा माणूस बनवतात.
आजच्या काळात चार्जर हरवला तर माणूस अस्वस्थ होतो, पण विचार हरवलेत याची कुणालाच भीती वाटत नाही. विचार हरवले, आणि नकळत माणसंही एकमेकांपासून हरवत गेली. कधी कधी वाटतं जगातली अनेक नाती तुटण्यापासून वाचली असती, जर माणसांनी थोडी जास्त पुस्तकं वाचली असती. आज नेट वर आपण जग बदलण्याची भाषा करतो पण हे लक्षात घेत नाही, की जग बदलायचं असेल तर शस्त्रांची नाही, पुस्तकांची गरज असते.
ग्रंथालय म्हणजे फक्त पुस्तकांचं घर नसतं, तर ते विचारांचं मंदिर असतं. म्हणून प्रत्येक गावात एक मोबाईल टॉवर नसेल, तरी चालेल पण प्रत्येकाच्या गावात एक ग्रंथालय असायलाच पाहिजे, आणि आज प्रत्येक घरामध्ये "देवघर" आहे, तसेच "ग्रंथघर" ही असायलाच पाहिजे. ज्याच्या घराला पुस्तकांचा सुगंध असतो, तिथे विचार कधी गरीब राहत नाहीत. प्रत्येकाच्या हातामध्ये एक मोबाईल नसेल तरीही चालेल, पण प्रत्येकाच्या हातात एक पुस्तक असलंच पाहिजे. कारण ज्याच्या हातात पुस्तक असतं, त्याच्या आयुष्यात अंधार फार काळ टिकत नाही. पुस्तकं फक्त अक्षरांनी भरलेली नसतात, तर ते कोणाच्यातरी जगलेल्या आयुष्याचा श्वास असतात, तर कधी ती कोणाच्यातरी आयुष्याची राख, वेदना आणि अनुभवांनी लिहिलेली असतात.
काही पुस्तकं वाचून संपतात, आणि काही पुस्तकं संपल्यानंतर मनात सुरू होतात. पुस्तकं कधीच मोठ्याने बोलत नाहीत, पण ती शांतपणे आयुष्य बदलून टाकतात. आज मोबाईलच्या स्क्रीनवर तासंतास नजर खिळून राहते. मान्य आहे मोबाइल वर खूप माहिती आहे, पण आज माहितीच्या महासागरात माणूस पोहत आहे, पण विचारांच्या तहानेने आतून कोरडा होत चाललाय म्हणूनच कदाचित आज नात्यांमध्ये शब्द उरलेत, पण संवाद हरवत चाललाय. आज प्रत्येक माणूस बोलतोय खूप, पण ऐकून घेणारं कुणीतरी हरवलंय. ते दु:ख मनात ठेऊन लोक जखमी होत आहेत. काही जखमा काळ भरत नाही, त्या पुस्तकं भरतात. पुस्तक वाचणारा माणूस कधीच पूर्ण एकटा नसतो, कारण प्रत्येक पानावर त्याला एक नवीन सोबत मिळत असते. माणसं वाचायला शिकायची असतील, तर आधी पुस्तके वाचली पाहिजेत. प्रत्येक माणूस जर पुस्तक म्हणून वाचला आणि प्रत्येक पुस्तक माणसासारखे जपले, तर जगातल्या अनेक भावनिक गुंत्यात अडकलेल्या माणसाला त्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील...
भावना आणि विचारांची मनात जागृती करून सामाजिक बांधिलकी जपायची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही.
वाचन हे कर्म आहे वाचन हे मार्ग आहे
ज्ञानाच्या महायज्ञात वाचन हाच एक धर्म आहे ..!
आज माहिती खूप आहे, पण समजून घेणारी माणसं कमी होत चालली आहेत. म्हणूनच कदाचित पुस्तकांची गरज आज जास्त आहे. कारण पुस्तकं फक्त वाचायला शिकवत नाहीत, ती माणूस म्हणून जगायलाही शिकवतात.
चला वाचूया, स्वतःला घडवूया...
#Kishor
Comments