स्वतःला ओळखण्याचा प्रवास हा कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो.
वाटा चालताना कधी समजत नाही, त्या आपल्याला कुठे घेऊन जातील, पण शेवटी कळतं त्या वाटांनीच आपल्याला आपली ओळख दिलेली असती.
आयुष्यातला प्रवास संपतच नाही, जन्मापासून सुरू झाला की, जिंदगीला फुलस्टॉप भेटल्यावरच काय तो संपतो ....!!
बालपणातलं स्वतःशीच खेळणं सर्वांना आवडतं, पण जेव्हा मोठे होतो, जबाबदारी येते, तेव्हा स्वतःशी खेळणं अन् पचवणं जिकिरीचं असतं, कठीण जातं. नंतर थोडे मोठे झालो, तर कुतूहलाने रांगत रांगत जाऊन आई बाबांच्या पायाला धरून उठण्याचा प्रयत्न करणं, आपल्यासाठी अन् आपलं कौतुक करणाऱ्या हितचिंतकांसाठी तो आनंदाचा क्षण असतो, पण आत्ता प्रवासात चालताना कुठं धडपडल्यासारखं झालं, तरी आई-बाबांना खुशालीतच आहे, हे पटवून देण्यात जास्त आनंद वाटतो. आणखी वर्ष-सहा महिन्यांचं झाल्यावर आधार घेऊन उठून, छुन-छुन घातलेल्या पायांनी पहिलं पाऊल टाकताना आई-बाबाने वाजवलेल्या टाळ्या अन् चेहऱ्यावर ओथंबून वाहणारा आनंद आजही हर्षभरीत करून जातो, पण आत्ता प्रवासात आधार घ्यावा वाटत नाही, तर आधार व्हावा वाटतो, त्यांतच आनंद वाटतो. जीवनात असे खूप प्रवास करावे लागतात, पण जीवनातला प्रवास संपत नाही हे तितकंच खरं...!!
जगणं म्हणजे स्वतःला ओळखण्याचा किंवा घडवण्याचा प्रवासच…
या प्रवासात, काही प्रवास असे असतात. जे फक्त चालले जात नाहीत, तर ते जगले जातात. खरा प्रवास तोच, जो आपल्याला स्वतःकडे घेऊन जातो. माझा शैक्षणिक प्रवासही तसाच बालवाडीच्या त्या छोट्याशा पावलापासून सुरू होऊन, आज तुझ्यापर्यंत येऊन थांबलेला. या प्रवासाने मला खूप काही दिलं, पण मला स्वतःशी भेट घडवून आणणारी जागा एकच ती म्हणजे "तु' माझी रूम.
प्रिय रूम,
शिक्षणासाठी आई-बाबांच्या कुशीतली ऊब सोडावी लागली, घर अन् घरासमोरील अंगण सोडावं लागलं, गावातली गल्ली अन् गाव सोडावं लागलं, मित्र-मंडळी, जाता येता गावातील वडीलधाऱ्या माणसांच्या तब्बेतीची चौकशी केल्याने निर्माण झालेलं एक जिव्हाळ्याचं नातं, हे सगळं-सगळं विसरून जड पावलाने अन् तितक्याच जड अंतःकरणाने, भरल्या डोळ्याने, एका नव्या प्रवासाला सुरुवात झालेली, आजही डोळ्यासमोर तरळते. आत्ता प्रत्येकवेळी घरी जाताना आई-बाबा बरोबरच, अंगण अन् गावातली गल्ली आतुरतेने वाट पाहते...!!
कालपर्यंत मन अगदी आनंदी आणि समाधानी होतं. सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण आज मात्र जणू कोणीतरी अचानक कानाखाली मारल्यासारखा भास झाला. थोडं थांबून, नीट पाहिलं, तेव्हा जाणवलं कॉलेजला जाणं, परत येणं, आणि या रूममध्ये स्वतःला सापडणं. हा दिनक्रम गेल्या काही दिवसांपासून माझ्या आयुष्याचा एक भाग बनला होता, पण आज ज्या रूममध्ये मी गेली दोन वर्षं राहिलो. ती रूम सोडायची वेळ आली, आणि खरं सांगायचं, तर ती माझ्यासाठी फक्त एक रूम नव्हती... काही जागा अशा असतात, जिथे आपण राहतच नाही, तर आपण घडत असतो, आणि मी जिथे घडलो, ती म्हणजे तु माझ्या प्रवासाची निःशब्द सोबती होती, तु माझ्या स्वप्नांची पहिली साक्षीदार होतीस.
तुझ्या चार भिंतींमध्ये मला माझं स्वतःचं जग सापडलं. तुझ्यामध्ये मी माझं कुटुंब पाहत होतो. तुझ्या खिडक्यांतून येणारा वारा मला नेहमी नवं स्वप्न देऊन जायचा. तुझ्या भिंतींनी माझे अश्रू पाहिले, माझं हसणं ऐकलं, आणि माझ्या प्रत्येक भावनेला कवटाळलं. तुझ्या छताखाली बसून मी कितीतरी रात्री जागून अभ्यास केला. टेबल-खुर्ची या फक्त वस्तू नव्हत्या, तर ते माझे साथीदारच होते. कधी थकलो, कधी हरलो, तर कधी गोंधळलो, तेव्हा तु मला शांत केलंस. तुझ्यात एक अशी शक्ती होती, जी मला नेहमी उभं राहायला शिकवत होती. जेव्हा बाहेरचं जग मला निराश करत होतं, तेव्हा तु मला आशा दिलीस. जेव्हा शब्द साथ देत नव्हते, तेव्हा तुझी शांतता माझ्याशी बोलत होती, आणि त्या शांततेतच मला माझं उत्तर सापडत होतं. तुझ्याशी माझं नातं शब्दांचं नव्हतं, तर ते होत फक्त जाणिवांचं. तुझ्या प्रत्येक कोपऱ्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी होती, जी मला निगेटिव्ह विचारांपासून दूर ठेवत होती. खरं सांगायचं तर, माझ्यापेक्षा माझ्या यशाची भूक तुला जास्त होती असं मला नेहमी वाटायचं. आज मी इथून निघतोय नवीन प्रवासासाठी, पण तुझ्यासोबतचे क्षण कायम माझ्या हृदयात राहतील. तुझ्या प्रत्येक भिंतीला, खिडकीला, त्या शांततेला आणि त्या ऊर्जेला माझा मनापासून नमस्कार.
खरंतर, तुझ्या शांततेत मला माझं उत्तर सापडलं, आणि तुझ्या एकांतात मला माझं अस्तित्व. या प्रवासाच्या प्रत्येक वाटेवर मृगजळ उभं होतं, आणि जणू प्रत्येक वळणावर एक फलक दिसायचा “इथे गुंतू नकोस… थांबू नकोस… जर हा प्रवास पूर्णत्वास न्यायचा असेल, तर इथे घरटं बांधून चालणार नाही.” त्या फलकांनी मला सतत आठवण करून दिली की, प्रवास हा फक्त चालायचा नसतो, तर तो पूर्ण करायचा असतो. बालवाडीच्या त्या निरागस सुरुवातीपासून आजच्या या शेवटच्या टप्प्यापर्यंत हा प्रवास फक्त पुस्तकांचा नव्हता, तर स्वतःला ओळखण्याचा होता. प्रत्येक पडणं, प्रत्येक अपयश, प्रत्येक छोटं यश यांनी मला घडवलं, बळकट केलं, मजबूत केलं. हा प्रवास माझ्यासोबत चालत राहिला, कधी सावलीसारखा, कधी आधारासारखा, तर कधी आरशासारखा. प्रवास संपतो, तेव्हा वाटतं आपण पुढे आलो, पण खरं तर आपण आतमध्ये खोलवर तळापर्यंत गेलेलो असतो, आणि आज जेव्हा मी शेवटचं पाऊल टाकतो आहे, तेव्हा मनात एकच भावना आहे. हा प्रवास संपला नाही, तो माझ्यामध्येच कायमचा जिवंत झाला आहे.
कुठूनतरी सुरू केलेला हा प्रवास आज कुठेतरी येऊन पोहोचतो आहे, आणि त्या जाणिवेत एक वेगळंच समाधान दडलं आहे. बेंगलोरसारख्या या अवाढव्य शहराला मी रोज सामोरं जात होतो. नवीन अनुभव येत होते, त्यांना शिकत होतो, त्यांना जगत होतो. सोबतीला खूप लोक होते, पण आजूबाजूला नीट पाहिलं की सावली मात्र नेहमी एकट्याचीच दिसायची. जगाने मला खूप काही शिकवलं, पण स्वतःला समजून घ्यायला तु शिकवलंस. बारावीनंतर घराची नाळ सुटली. आणि तेव्हापासून आजपर्यंत कधीच मागे वळून पाहिलं नाही. घराची आठवण येऊ दिली नाही. कारण प्रवासालाच हमसफर मानून मी सतत पुढे चालत राहिलो, पण आज मन थांबतंय, मन मागे वळून पाहतंय आणि या रूममधून पाय बाहेर पडत नाहीयेत. ज्या रूमने, ज्या वास्तूने माझी मेहनत पाहिली, माझा वाईट काळ पाहिला, आणि माझा चांगला काळही साजरा केला. ती वास्तू सोडून जाताना जणू काळजावर कुणीतरी वार केल्यासारखं वाटतंय. या शहराने मला खूप काही दिलं, अनेक अनुभव दिले, जे कधी पाहिले नव्हते, कधी जगले नव्हते, काही अनुभव खूप सुंदर होते, मजेशीर होते. आयुष्याला दिशा देणारे होत, पण काही अनुभव असेही होते जे रडवून गेले, चेहऱ्यावरचं हास्य हिरावून घेऊन गेले, आणि काही काही, तर मन आतून रिकामं करून गेले, तेव्हा…
हे सगळं कोणाशी शेअर करायचं?
कोणाला सांगायच?
म्हणून, मी पुन्हा यायचो तुझ्याकडे, कधी शांत बसून स्वतःशीच बोलत राहायचो, कधी आरशासमोर उभा राहून स्वतःलाच प्रश्न विचारायचो.
आज काय झालं?
काल काय झालं?
आणि यातून मी काय शिकलो?
या छताखाली मी गेली दोन वर्षं जगत होतो. मान्य आहे, ही जागा निर्जीव होती, पण तरीही जिवंतासारखी माझ्याशी बोलायची, लळा लावायची, आणि अंधार झाला, की परत आपल्याकडे बोलवुन घ्यायची. दिवसभर लाखो लोक भेटायचे. प्रत्येकाचं जगणं वेगळं, वागणं वेगळं, बोलणं वेगळं. नाविलाजाने मला त्यांच्यात मिसळावं लागायचं आणि मी मिसळतही जायचो. कधी जशास तसे, तर कधी त्यांच्या रंगात रंगून, पण पुन्हा या रूममध्ये आल्यावर, आरशात स्वतःकडे पाहिलं की मला “किशोर” दिसायचा. या वास्तूमध्ये कोणती शक्ती होती, माहित नाही. कितीतरी लोक पाहिले, त्यांच्या सवयी पाहिल्या, त्यांच्या जगण्याच्या पद्धती पाहिल्या, पण एकही दिवस मनाला असं वाटलं नाही, की त्यांच्यासारखं व्हावं, कारण हीच वास्तू, मला माझ्याशी घट्ट बांधून ठेवत होती. आज असं वाटतय या वास्तूलाच, या प्रवासालाच माझ्या यशाची भूक माझ्यापेक्षा जास्त होती. माझा स्वभाव जसा होता, तसाच शेवटपर्यंत टिकवून ठेवला. मला स्वतःच्या पायावर उभं राहेपर्यंत, ठामपणे, निःशब्दपणे, पण पूर्ण विश्वासाने माझ्यासोबत उभी राहिली हीच रूम, आणि आज मी तिला काहीच देऊ शकलो नाही… फक्त शेवटचं एकदा डोळे भरून पाहिलं, डोळ्यांत भरून आलेले थेंब सोबतीला होते. आतापर्यंत खूप वेळा रडलो असेन लोकांमुळे, परिस्थितीमुळे, शब्दांमुळे, पण आज मन भरून आलं नाही, तर उर भरून आलाय, कारण हा निरोप आहे.
पुढच्या प्रवासाला निघताना म्हणतात की, मागे वळून पाहिलं की आठवणींचा श्राप लागतो. आज मला तो श्राप स्वीकारायचा आहे. मला मागे वळून पहायच आहे. जिथपर्यंत तु दिसत राहशील, तिथपर्यंत मी मागे वळून पाहत राहीन, कारण कोणाच्या प्रेमात किती वेडं व्हावं यालाही मर्यादा असतात, पण आज मला ती मर्यादा तोडायची आहे. नेहमी घरातून निघताना घरचे सगळे मला निरोप द्यायला बाहेर यायचे, पण मी कधीच मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं नाही. कदाचित म्हणूनच आजवर स्वतःला थांबवलं, पण आज मात्र मन हट्ट करतंय. आज मला मागे वळून पाहायचं आहे. आणि पाहिलंही मी, त्या सगळ्या प्रवासाकडे एकदा मनभरून. त्या प्रवासाला एक घट्ट मिठी मारायची आहे, त्याच्याशी थोडं बोलायचं आहे, खूप साऱ्या न बोललेल्या गोष्टी त्याच्यासोबत बोलायच्या आहेत, काही प्रश्न विचारायचे आहेत, आणि शेवटी शांतपणे त्याचा निरोप घ्यायचा आहे, कारण काही निरोप हे शेवट नसतात, तर ते आयुष्याला कायमचं बदलून टाकणारे वळण असतात.
त्या रूमचे काही नियम होते.
रात्री नऊ वाजण्याआधी रूममध्ये परत येणं. रूममध्ये कुठल्याही प्रकारचं खाणं न आणणं. मोठ्या आवाजात बोलायचं नाही, फोनवरही शांतपणेच बोलायचं. रात्री अकरा वाजता लाईट बंद आणि त्याची जबाबदारी स्वतः घ्यायची. घरी जायचं असेल, तर तीन दिवस आधी परवानगी घ्यायची. असे अनेक नियम होते त्या रूमचे. सुरुवातीला ते सगळं खूप कडक वाटायचं, अगदी निरर्थकही वाटायचं. असं कुठे नियम असतात का? असं मनात वारंवार यायचं, पण हळूहळू त्या नियमांमध्ये जगताना काहीतरी बदलत गेलं. शिस्त अंगवळणी पडली, वेळेचं महत्त्व कळायला लागलं, आणि स्वतःला सांभाळायला शिकलो. आज तीच रूम सोडताना एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. ते नियम त्या रूमचे नव्हतेच कधी… ते नियम मला घडवण्यासाठी होते. त्या दिवशी सजमलं, की काही बंधनं आपल्याला थांबवत नाहीत, तर ती आपल्याला योग्य दिशेने चालायला शिकवतात.
आज डोळ्यांसमोर सगळं उभं आहे. वडिलांनी शाळेत घातलेला तो पहिला दिवस, आणि आजचा हा शेवटचा क्षण. या दोन टोकांमध्ये माझं संपूर्ण आयुष्य आणि मी उभा आहे. कुठेतरी त्या बालवाडीला न्याय द्यायचा होता. तिचं अस्तित्व सिद्ध करायचं होतं. म्हणूनच हा प्रवास फक्त माझा राहिलेला नव्हता, तर तो त्या प्रत्येक वर्गाचा आहे, जिथे मी बसलो, शिकलो, घडलो. प्रत्येक बाक, प्रत्येक फळा, प्रत्येक मैदान यांनी माझ्या यशात आपला वाटा दिला आहे. आज मी इथे उभा आहे, पण माझ्यामागे उभा आहे तो संपूर्ण प्रवास.
बारावीनंतर बॅचलरचं शिक्षण हॉस्टेलवर पूर्ण केलं, आणि त्या हॉस्टेलसोबतच आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. त्या हॉस्टेलने मला खूप काही शिकवलं व असंख्य आठवणी दिल्या. खरं तर, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत त्या हॉस्टेलचा खूप मोठा वाटा आहे.

घरापासून दूर असताना, तेच हॉस्टेल माझं "घर" बनलं होतं. सुरुवातीचे काही दिवस जरा जड गेले. मनाला समजावून, स्वतःलाच धीर देत ते दिवस कसेतरी पार केले, पण हळूहळू तेच हॉस्टेल आपलं वाटायला लागलं, आणि जेव्हा ते सोडायची वेळ आली, तेव्हा जाणवलं घर सोडताना जसं वाईट वाटलं होतं, तसंच काहीसं त्या हॉस्टेलची रूम सोडताना वाटलं. शेवटचं कुलूप लावताना, डोळ्यांच्या कडेला नकळत पाणी आलं होतं, कारण त्या चार भिंतींमध्ये फक्त राहणं नव्हतं, तर जगणं होतं. त्या काळात कॉलेजमध्ये खूप चांगले मित्र-मैत्रिणी भेटले. असे की, ज्यांनी “जीवाला जीव” दिला. कधी वाटलंच नव्हतं की, इतकी जवळची माणसं आयुष्यात येतील. आज काही कारणांनी संपर्क कमी झाला असला, तरी त्यांना विसरणं शक्यच नाही, कारण काही नाती अंतराने दूर जातात, पण मनातून कधीच नाहीशी होत नाहीत. प्रवास करताना काही गोष्टी मागे राहतात, काही सोडून द्याव्या लागतात, पण त्या कधीच विस्मरणात जात नाहीत. त्या आठवणी बनून आपल्यासोबत चालत राहतात. जगण्यातली खरी श्रीमंती ही माणसं आणि आठवणी यातच असते. वेळ निघून जातो, पण काही क्षण काळाच्या पलीकडे जिवंत राहतात, आणि कदाचित म्हणूनच या प्रवासाचा हव्यास कधीच संपत नाही. पायांत थकवा असला, तरी मन पुन्हा पुन्हा चालत राहायला सांगतं. अनंत अडचणींमधून मार्ग काढत, हा प्रवास आनंदाने करत राहायचा, आणि फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांनाही त्या आनंदात सामावून घ्यायचं. कारण शेवटी हा प्रवासच एक दिवस महोत्सव होतो, आणि त्या महोत्सवात प्रत्येक आठवण, प्रत्येक माणूस, पुन्हा एकदा जिवंत व्हावा…!
मी फक्त प्रवाहासोबत वाहत राहिलो, आणि त्या प्रवाहाने मला घडवत नेलं. या प्रवासात अनेक टप्पे आले, पण प्रत्येक टप्प्यावर मी फक्त पुढेच गेलो नाही, तर माणसं जोडत गेलो, आणि नकळत स्वतःचं एक छोटंसं जग उभं केलं. चुका झाल्या, त्या मान्य केल्या. त्यातून शिकलो, स्वतःला सुधारत गेलो, आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवली तीच चूक पुन्हा होऊ नये. आज या क्षणी, हा प्रवास एका टप्प्यावर येऊन पूर्ण झाला आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न अखेर साकार झालं आहे. या प्रवासात मला खूप माणसं भेटली. ज्यांनी मला साथ दिली, आधार दिला, आणि प्रत्येक वेळी मला पुढे जाण्याची ताकद दिली. मी जणू एखाद्या मधमाशीसारखा, प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक माणसातून थोडं थोडं “परागकण” गोळा करत गेलो, आणि आज त्याचं एक सुंदर “मधाचं पोळं” तयार झालं आहे, ते म्हणजे तुम्ही सगळेच. पुन्हा एकदा सिध्द झालं, आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थितीच नाही, तर परिस्थितीही बदलते. या प्रवासात मी कधीच एकटा नव्हतो, पावलोपावली मला अनेक माणसं भेटत गेली. आयुष्याचा वाटेवर चालत असताना आपल्याला अशीही माणसं भेटतात जी काहीही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करून जातात. करिअरला कळत-नकळत आकार देतात, कारण शेवटी यश एकट्याचं नसतं, तर ते अनेक हातांच्या आधारावर उभं असतं. उगीचच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्जवल भविष्याचा विचार अन् साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती..!
या प्रवासात भेटलेली माणसं म्हणजे जणू काही थांबेच होते. प्रत्येक थांब्याने मला काहीतरी दिलं, काहीतरी शिकवलं. काही थोडा वेळ सोबत राहिली, तर काही कायमची मनात घर करून गेली. काही माणसं वाऱ्यासारखी आली आणि निघून ही गेली, पण त्यांच्या स्पर्शाने मनात कायमची हलचल निर्माण झाली, काही माणसं सावलीसारखी सोबत राहिली. उन्हात जळताना मला थंडावा देत, शांतपणे माझ्यासोबत चालत राहिली. त्यांनी माझ्यावर पावलोपावली छाप टाकली, आणि कदाचित मीही त्यांच्या आयुष्यात एक छोटीशी आठवण बनून राहिलो. काहींनी मला हसवलं, काहींनी रडताना सांभाळलं, काहींनी धीर दिला, तर काहींनी माझ्यावर विश्वास ठेवून, मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. आज जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा जाणवतं हा प्रवास फक्त माझा नव्हता. तो त्या प्रत्येक माणसाचा होता, ज्यांनी मला घडवलं, उभं केलं, आणि पुढे चालायला शिकवलं. काही प्रवास एकट्याने चालले जात नाहीत, तर ते अनेकांच्या प्रेमाने पूर्ण होतात. प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी भेटत गेलं, काहीतरी शिकवत गेलं, आणि नकळत माझ्यावर संस्कार होत गेले. हा प्रवास फक्त माझा नव्हताच, तर तो होता, माझ्या आई-वडिलांच्या स्वप्नांचा, त्यांच्या कष्टांचा, माझ्या नातेवाईकांच्या अपेक्षांचा, माझ्या मित्रमंडळींच्या विश्वासाचा, माझ्या शिक्षकवृंद, गुरुजनांच्या आशीर्वादांचा, आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक हितचिंतकाच्या आशेचा, आणि म्हणूनच हा प्रवास “मी” चा नव्हता, तर तो “आपला” सगळ्यांचा होता.
गावातल्या मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाच्या शेजारील बालवाडीपासून सुरू झालेला हा प्रवास. आज कर्नाटक राज्यातील बेंगलोर शहरात, या रूमपर्यंत येऊन थांबला आहे, किंवा कदाचित, इथे फक्त एक स्वल्पविराम घेतो आहे. अंगणवाडीत टाकलेलं ते पहिलं पाऊल, आणि आज या रूममधून बाहेर पडताना ठेवलेलं हे शेवटचं पाऊल. या दोन पावलांमध्ये एक संपूर्ण आयुष्याचा प्रवास सामावलेला आहे. त्या वेळी चालायला शिकत होतो. आज पडून पुन्हा उभं राहायला शिकलो आहे. त्या पहिल्या पावलावर उभा असताना, तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की हा प्रवास मला एखाद्या अनोळखी राज्यात, एखाद्या अनोळखी शहरात आणून उभं करेल. क्षणभर वाटतं थोडा वेळ इथेच थांबावं, पण वेळ कुणासाठीच थांबत नाही, हे ही तितकचं खरयं. बालवाडीच्या त्या निरागस सुरुवातीपासून, आजपर्यंत मी फक्त अंतर नाही पार केलं, तर स्वतःलाच ओलांडत आलो आहे. माझा शैक्षणिक प्रवास बालवाडीच्या त्या छोट्याशा पावलापासून सुरू झाला, तेव्हा ना काही कळत होतं, ना काही समजत होतं, पण स्वप्नं मात्र नकळत रुजत होती. अनेक वेळा पडलो, गोंधळलो, स्वतःवर शंका घेतली, पण प्रत्येक वेळी स्वतःलाच एकच सांगितलं, “थांबायचं नाही… कारण स्वप्नं अजून जिवंत आहेत. त्याने मला संयम दिला, जिद्द दिली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. या प्रवासात खूप काही स्वप्नं पूर्ण झाली, पण खरी भूक अजून शिल्लक आहे, म्हणूनच आता पुन्हा एकदा चालत राहायचं आहे. स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने, स्वतःच्या जिद्दीच्या बळावर, आणि आयुष्याला सतत सांगत राहायचं आहे. अजून गा रे… अजून गा रे… अजून बरंच काही बाकी आहे..!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती, प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तु मला आठवत राहशील. आज माझ्याकडे सांगायला इतकं काही आहे, की शब्दही कमी पडतील. हजारो किस्से आहेत, हजारो गोष्टी आहेत, लाखो आठवणी, आणि अगणित अनुभवांची शिदोरी. मी आज अनुभवांची ती शिदोरी घेऊन जातोय, नक्कीच ते माझ्या आयुष्यात कामी येतीलच पण लोकांच्याही कामी कसे येतील याचा विचार करेन.
लोक म्हणतात यश मिळवण्यासाठी मेहनत लागते, पण मला माहित आहे. त्या मेहनतीला उभं राहायला एक जागा लागते, आणि ती तु होतीस. तुझं दर्शन घेऊन निघताना वाईट का वाटतं? पुन्हा एकदा मागे वळून का पाहावस वाटतं? प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजे आपलेपणा का? आणि आपलेपणा नेमका काय असतो? आपलेपणा म्हणजे, मी त्याची आहे, आणि तो माझा आहे, हीच भावना दोघांच्याही मनात सारखीच असणं, आणि तो आपलेपणा आपल्या दोघांमध्ये होता, म्हणूनच कदाचित हा निरोप जड वाटतोय, त्यामुळे आता निरोप देणं/घेणं गरजेच वाटत आहे, कारण आयुष्यातील प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीस किंवा गोष्टीस योग्य वेळी निरोप दिला, की आयुष्य नव्याने सुरुवात करायला सज्ज होतं. आयुष्याच्या पुढच्या प्रवासात मी अजून कितीतरी रूममध्ये राहीन. कितीतरी शहरं पाहीन, कितीतरी खेडी ओलांडत जाईन, पण या रूमची उब, या रूमची साथ कुठेच मिळणार नाही. म्हणूनच, प्रत्येक नवीन रूममध्ये मी तुझीच सावली शोधत राहीन. कदाचित ती सापडणार नाही, पण शोध मात्र कधी थांबणार नाही.
या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात, मला विविध भूमिका साकारायला, अनुभवायला मिळाल्या. कधी एक वक्ता म्हणून विचार मांडण्याची संधी मिळाली, तर कधी फळा आणि विद्यार्थ्यांसोबत नातं निर्माण करत शिक्षकाच्या भूमिकेत उभं राहण्याचा अनुभव आला. कधी कलाकार बनून रंगमंचावर स्वतःला साकारलं, तर कधी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारत इतरांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं धैर्य मिळालं. या प्रत्येक भूमिकेने मला केवळ घडवलं नाही, तर जबाबदारीची जाणीव करून दिली, कारण पदवी ही फक्त कागदावर मिळते, पण व्यक्तिमत्त्व या भूमिकांमधून घडतं. त्या प्रत्येक जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे पार पाडू शकलो हीच या प्रवासाची खरी कमाई आहे.
थोडं अलंकारिक वाटेल, पण मला मनापासून असं वाटतं ही वाट, हा प्रवास माझ्या भाग्यरेषेवर एखाद्या संस्कारांच्या ठशासारखा कोरला गेला आहे.
आधी बीज एकले, नंतर फळे अनेकले…
तुकोबांच्या या एका ओळीतच माझा संपूर्ण प्रवास दडलेला आहे. बालवाडीच्या त्या छोट्याशा सुरुवातीपासून सुरू झालेला हा प्रवास, आज माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन उभा आहे. २४ मे २०२६ रोजी आमचं Convocation Ceremony (पदवीदान समारंभ) होणार आहे. त्या दिवशी या संपूर्ण प्रवासाचं एक अधिकृत प्रमाणपत्र हे माझ्या हातात येईल, पण खरं सांगायचं, तर हा प्रवास आजच संपतो आहे, कारण कागदावर मिळणारं प्रमाणपत्र हे फक्त एक औपचारिक मान्यताच असते, पण त्या मागे उभी असलेली मेहनत, अनुभव, आणि घडलेलो “मी” त्याचा शेवट आज इथेच होत आहे. स्वतःला ओळखण्याचा हा प्रवास कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो. आजपासून पुढील प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. होय, मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो, कारण शिक्षण हे कधीच फक्त शाळा किंवा कॉलेजपुरतं मर्यादित नसतं, तर आयुष्यच त्याची खरी शाळा असते. जिथे प्रत्येक अनुभव, प्रत्येक चूक, आणि प्रत्येक दिवस त्याला काहीतरी नवीन शिकवत असतो. रोजच्या व्यवहारातून, चुकांमधून आणि नवनवीन अनुभवातून तो आयुष्यभर शिकत राहतो म्हणूनच, त्याची विद्यार्थी दशा कधीच संपत नाही, पण आता थांबतो आहे, तो फक्त हा टप्पा. माझ्यातला विद्यार्थी नाही, कारण विद्यार्थी असणं म्हणजे फक्त शिक्षण घेणं नाही, तर आयुष्यभर शिकत राहणं आहे. शिक्षण संपत नाही ते फक्त पुस्तकांतून आयुष्याच्या अनुभवांमध्ये रूपांतरित होतं. वाटा कितीही बदलल्या, तरी चालणाऱ्याचं ध्येय बदलत नाही...आणि तो प्रवास त्या वाटेवर अजूनही सुरूच आहे, सुरू राहीलचं..!


Comments
आज तू केवळ एका टप्प्यावर पोहोचला नाहीस, तर जबाबदारीच्या नव्या वाटेवर पाऊल टाकत आहेस. स्वभावाने साधा, मनाने प्रामाणिक आणि कर्तृत्वाने उजळणारा तू—एक “किशोर” म्हणून नव्हे, तर उद्याचा जबाबदार नागरिक म्हणून घडत आहेस, हे पाहून मन भरून येते.
शिक्षण म्हणजे फक्त पदवी मिळवण्याचा प्रवास नाही; तो आयुष्याला दिशा देणारा, माणूस म्हणून घडवणारा आणि प्रत्येक क्षणाला नवी ओळख देणारा एक सुंदर अनुभव असतो. त्या प्रवासात तू प्रामाणिकपणे चालत राहिलास, प्रत्येक अडचणीला सामोरा गेलास आणि शिक्षकांच्या अपेक्षांना सार्थ ठरवलंस—याचा मला शिक्षक म्हणून खूप अभिमान आहे.
शाळेतील ते दिवस, तुझं हसणं, शिकण्याची जिद्द आणि प्रत्येक क्षणातील उत्साह—ही सगळी आठवण कायम मनात जपली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याकडून शिक्षकाला जी अपेक्षा असते, ती तू केवळ पूर्णच नाही केलीस, तर त्याला एक नवा अर्थ दिलास.
आयुष्यात पुढे कितीही मोठा हो, कितीही उंच भरारी घे—पण हीच नम्रता, प्रामाणिकपणा आणि मेहनतीची साथ कधी सोडू नकोस.
तुझ्या प्रत्येक यशात माझा आशीर्वाद आणि अभिमान कायम तुझ्यासोबत असेल.
अरुण माने✨
मराठा हायस्कूल चौराहा छत्रपती संभाजीनगर