प्रिय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो...❤️

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

सर्वप्रथम तुम्ही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाला आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन.. ! 

आज तुमच्या हातात आलेली ही मार्कशीट फक्त कागदाचा तुकडा नाही, तर ती तुमच्या अनेक वर्षांच्या संघर्षाची, मेहनतीची, संयमाची आणि स्वप्नांची साक्ष आहे. कधी पहाटे उठून केलेला अभ्यास, कधी रात्री उशिरापर्यंत डोळ्यांवर झोप असताना वाचलेले धडे, कधी आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तुमच्यासाठी केलेले कष्ट, तर कधी शिक्षकांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास. या सगळ्याचं हे सुंदर फळ आहे.

पहिली इयत्तेपासून सुरू झालेला हा प्रवास खरंच सोपा नव्हता. कधी अभ्यासाचा ताण आला, कधी अपयशाची भीती वाटली, कधी लोकांनी तुलना केली, तर कधी स्वतःलाच स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडावं लागलं. कधी मित्र पुढे गेले म्हणून वाईट वाटलं असेल, कधी “मी करू शकेन का?” हा प्रश्न स्वतःलाच पडला असेल, पण या सगळ्या परिस्थितींवर मात करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात. म्हणून सर्वात आधी एक गोष्ट शिका. स्वतःचं कौतुक करायला शिका.

आपण आयुष्यात खूप वेळा स्वतःच्या चुका मोजत बसतो, पण स्वतःची मेहनत आणि प्रयत्न यांचं कौतुक करायचं विसरून जातो. आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि आरशात बघून स्वतःला सांगा.

“हो, मी मेहनत घेतली.
मी पडत-पडत इथपर्यंत आलो.
आणि मला स्वतःचा अभिमान आहे.”

कारण स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकलेला माणूसच आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे जातो. आता पुढचा प्रवास सुरू होणार आहे. हा प्रवास फक्त करिअरचा नाही, तर स्वतःला घडवण्याचा आहे. यापुढे तुम्हाला फक्त पुस्तकांमधून नाही, तर लोकांमधून, परिस्थितींमधून, अपयशातून आणि अनुभवातून शिकायचं आहे. लक्षात ठेवा, यश फक्त एकट्याने मिळवायचं नसतं. सोबतची माणसं जपत, आई-वडिलांचा मान ठेवत, मित्रांना साथ देत आणि कोणालाही खाली न खेचता पुढे जाण्यातच खरं मोठेपण असतं. कारण आयुष्याच्या शेवटी लोक तुमचे मार्क्स विसरतात, पण तुम्ही माणूस म्हणून कसे होता, हे कायम लक्षात ठेवतात.

दहावी-बारावी म्हणजे शेवट नाही, तर आयुष्याच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात 

लहानपणापासून एक गोष्ट आपण सतत ऐकत आलो आहोत. “दहावी पास हो, बारावी पास हो, मग Life Set  होईल.” ही गोष्ट ऐकता ऐकता आपण मोठे होतो. आपल्यालाही वाटायला लागतं की दहावी-बारावी म्हणजे आयुष्याचं अंतिम ध्येय आहे. पण खरं सांगायचं, तर दहावी-बारावीनंतरच खरं आयुष्य सुरू होतं. आत्तापर्यंत तुम्ही शाळेच्या सुरक्षित भिंतीमध्ये होतात. तुमच्या चुका माफ केल्या जायच्या. शिक्षक पुन्हा पुन्हा समजावून सांगायचे. आई-वडील तुमचा हात धरून तुम्हाला चालवत होते. घरची माणसं तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेत होती. पण आता आयुष्य तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवणार आहे. आता प्रत्येक निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. कोणत्या लोकांसोबत राहायचं, कोणत्या मार्गाने पुढे जायचं, कोणत्या गोष्टी शिकायच्या आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचं हे सगळं तुम्हालाच ठरवावं लागणार आहे. म्हणून यापुढे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.  “स्वातंत्र्य मिळणं जितकं सुंदर असतं, तितकीच त्यासोबत जबाबदारीही वाढत असते.” आता तुम्हाला स्वतः चालायला शिकायचं आहे. पडलात तर स्वतः उठायचं आहे. हरलात तरी पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. आणि प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिकत राहायचं आहे. कारण, आता जगच तुमची शाळा आहे. इथं प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काही शिकवणार आहे. कधी एखादा चांगला मित्र आयुष्याचा अर्थ शिकवेल, तर कधी एखादा चुकीचा अनुभव सावध राहायला शिकवेल. कधी अपयश तुम्हाला मजबूत बनवेल, तर कधी एखादं छोटंसं यश पुन्हा उभं राहण्याची हिंमत देईल. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे शिकण्याच्या नजरेने बघायला शिका. 

या पुढच्या प्रवासात तुम्हाला खूप गोष्टी आकर्षित करतील. काही लोक पटकन पैसे कमावण्याचे मार्ग दाखवतील. काही लोक चुकीच्या सवयी “Cool” असल्यासारख्या दाखवतील. काही जण तुम्हाला अभ्यास, स्वप्नं आणि आई-वडिलांच्या विश्वासापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा.  “क्षणिक आनंदासाठी कायमचं आयुष्य खराब करू नका.” वाईट सवयी सुरुवातीला मजा वाटतात, पण नंतर त्या माणसाचं आयुष्य, स्वप्नं आणि घरच्यांचा विश्वास सगळं हिरावून घेतात. त्यामुळे चुकीच्या संगतीपासून दूर राहा. कोणत्याही व्यसनाला “एकदाच करून बघतो” म्हणून सुरुवात करू नका. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक चमकणारं आयुष्य खरं असतंच असं नाही. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे. तो शांतपणे, प्रामाणिकपणे आणि आनंदात पूर्ण करा.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट यश एकट्याने मिळवण्यात मजा नसते. सोबतची माणसं जपत, आई-वडिलांचा मान ठेवत, मित्रांना साथ देत, कोणाला खाली न खेचता वर जात राहणं हेच खरं मोठेपण आहे. कारण आयुष्यात खूप पैसे कमावणारे लोक भेटतील पण माणुसकी जपणारे लोक फार कमी भेटतात. तुम्ही त्या कमी लोकांपैकी एक बना.

आणि शेवटी, घाई करू नका. प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली नाही म्हणून स्वतःला अपयशी समजू नका. फुलालाही उमलण्यासाठी वेळ लागतो. तसंच माणसालाही घडण्यासाठी वेळ लागतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, शिकत राहा, नम्र राहा, आणि आयुष्याचा हा पुढचा प्रवास हसत-हसत पूर्ण करा.

मार्क्स महत्त्वाचे आहेत, पण तेच सर्व काही नाहीत. 

काही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले असतील. काहींना अपेक्षेपेक्षा कमी मिळाले असतील.  तर काही जण असेही असतील ज्यांनी निकाल पाहिल्यानंतर स्वतःलाच प्रश्न विचारला असेल.  “मी खरंच इतका कमी आहे का?” पण इथेच एक गोष्ट मनामध्ये कायमची कोरून ठेवा “मार्क्स तुमची किंमत ठरवत नाहीत.” हो, मार्क्स महत्त्वाचे असतात. ते पुढचा मार्ग निवडायला मदत करतात. कोणत्या क्षेत्रात प्रवेश मिळेल, कोणत्या कॉलेजमध्ये जाता येईल, हे ठरवण्यात त्यांचा उपयोग होतो. पण आयुष्याचा अंतिम निकाल मार्कशीट ठरवत नाही. कारण आयुष्यात फक्त पुस्तकातील उत्तरं लिहून यश मिळत नाही. इथं माणसाला संयम लागतो, धैर्य लागतं, सातत्य लागतं, लोकांशी वागता येणं लागतं, अपयशातून पुन्हा उभं राहता येणं लागतं. आणि या गोष्टी कोणत्याही मार्कशीटमध्ये लिहिलेल्या नसतात.

कमी मार्क्स आले म्हणून स्वतःला कमी समजू नका. एका निकालामुळे आयुष्य संपत नाही. आज कमी मार्क्स आले म्हणून उद्या तुम्ही मोठं होणार नाही असं नाही. आणि आज जास्त मार्क्स आले म्हणून आयुष्यभर यश तुमच्या पायाशीच राहील असंही नाही. कारण आयुष्य प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत असतं. कधी कमी मार्क्स मिळालेला विद्यार्थी आयुष्यात खूप मोठं काहीतरी करून दाखवतो, तर कधी Topper असलेली व्यक्ती स्वतःच्या अहंकारामुळे मागे पडते. म्हणून, जास्त मार्क्स आले म्हणून गर्व करू नका, आणि कमी मार्क्स आले म्हणून स्वतःचा तिरस्कारही करू नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमची खरी स्पर्धा दुसऱ्यांसोबत नाही, तर ती स्वतःसोबत आहे. समाज तुम्हाला सतत तुलना करून दाखवेल. “त्याला इतके मार्क्स आले” “ती त्या कॉलेजमध्ये गेली” “तो तुझ्यापेक्षा पुढे निघून गेला” हे सगळं ऐकायला मिळेल. पण दुसऱ्यांचा प्रवास पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. फुलं सुद्धा सगळ्या एकाच वेळी उमलत नाहीत. मग माणसांनी स्वतःची तुलना का करायची?

कालपेक्षा आज चांगलं बनणं,
कालपेक्षा आज थोडं जास्त शिकणं,
कालपेक्षा आज थोडं जास्त समजूतदार होणं.

हेच खरं यश आहे.

जर तुम्ही रोज स्वतःमध्ये छोटासा बदल घडवत असाल. रोज नवीन काही शिकत असाल. रोज कालच्या चुका सुधारत असाल, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. आणखी एक गोष्ट, सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश खरं नसतं. लोक तिथं त्यांचे मार्क्स, कॉलेज, आनंद दाखवतात.  पण त्यामागचा संघर्ष, ताण, रडणं आणि अपयश फार कमी लोक दाखवतात. म्हणून दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःचं आयुष्य वाईट आहे असं समजू नका. तुमच्या गतीने पुढे चला. हळू चाललात तरी चालेल, पण चुकीच्या वाटेवर जाऊ नका. जर कमी मार्क्स आले असतील तर स्वतःला एक संधी अजून द्या, काय चुकलं हे शांतपणे समजून घ्या, आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. अपयश हे शेवट नसतं.  ते पुढे अजून मजबूत बनण्यासाठी मिळालेलं प्रशिक्षण असतं. आणि जर चांगले मार्क्स आले असतील तर नम्र राहा. आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि सोबत चालणाऱ्या मित्रांचे आभार माना. कारण “एकट्याने मिळालेलं यश मोठं असू शकतं, पण सगळ्यांना सोबत घेऊन मिळालेलं यश सुंदर असतं.”

जर तुम्हाला तुमचा मार्ग सापडला असेल तर…

खूप विद्यार्थ्यांनी आधीच ठरवलं असेल, की इंजिनिअर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, सरकारी अधिकारी व्हायचं, व्यवसाय उभा करायचा, कलाकार बनायचं, खेळाडू व्हायचं, किंवा स्वतःचं काहीतरी वेगळं निर्माण करायचं. आणि खरं सांगायचं तर स्वतःचा मार्ग सापडणं ही खूप मोठी गोष्ट असते. कारण या जगात खूप लोक आयुष्यभर फक्त गर्दीसोबत चालत राहतात, पण स्वतःचं स्वप्न ओळखणारे लोक फार कमी असतात. म्हणून जर तुम्हाला तुमची दिशा सापडली असेल, तर त्या दिशेने पूर्ण ताकदीने, पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने पुढे चला. लोक काय म्हणतील, कोण हसेल, कोण टोमणे मारेल याचा जास्त विचार करू नका. जग सुरुवातीला प्रत्येक स्वप्नावर हसतं आणि तेच स्वप्न पूर्ण झाल्यावर टाळ्या वाजवतं. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, “स्वप्न पूर्ण करताना स्वतःला हरवू नका.” आजकाल यशाच्या मागे धावताना खूप लोक स्वतःचं हसणं विसरतात. स्वतःची शांतता हरवून बसतात. स्वतःच्या आवडी, छंद, माणसं आणि आनंद यांच्यापासून दूर जातात. मोठं होणं महत्त्वाचं आहे, पण मोठं होताना मनाने रिकामं होणं योग्य नाही. तुमच्या आवडी जपा. लिहिता येत असेल तर लिहा. गाता येत असेल तर गा, वाचायला आवडत असेल तर वाचा, Dance करा, Drawing करा, खेळा, फिरा, फोटो काढा, नवीन लोकांना भेटा, निसर्गात वेळ घाला, आई-वडिलांसोबत गप्पा मारा, मित्रांसोबत मनमोकळं हसा. कारण, हे छोटे छोटे छंदच माणसाला जिवंत ठेवतात. फक्त पैसे कमावणं म्हणजे आयुष्य नाही, तर जगताना आनंद मिळणं म्हणजे खरं आयुष्य. तुम्ही डॉक्टर झालात, इंजिनिअर झालात, अधिकारी झालात, पण स्वतःचं हसणं हरवलं, मन शांत राहिलं नाही, लोकांशी प्रेमाने बोलता आलं नाही, तर त्या यशाला अर्थ उरत नाही. म्हणून करिअरसोबत स्वतःलाही वेळ द्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या स्वप्नांच्या प्रवासात तुम्हाला खूप लोक भेटतील. काही तुमच्यावर विश्वास ठेवतील, काही तुमच्यावर हसतील,  काही तुम्हाला चुकीच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न करतील. कधी लोक म्हणतील “इतकी मेहनत करून काय होणार?”, “सोडून दे”, “हे तुझ्याने नाही होणार” पण लक्षात ठेवा दुसऱ्यांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. यश एका दिवसात मिळत नाही. मोठं झाड सुद्धा एका रात्रीत वाढत नाही. त्यासाठी वेळ, संयम, सातत्य आणि स्वतःवर विश्वास लागतो. पुढच्या काळात तुम्हाला सोशल मीडियावर खूप चमकणारं आयुष्य दिसेल. कोणीतरी मोठी गाडी घेतलेली दिसेल, कोणीतरी परदेशात फिरताना दिसेल, कोणीतरी “सेटेल” झाल्यासारखा दिसेल, पण प्रत्येक चमकणारं आयुष्य आनंदी असतंच असं नाही. म्हणून दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःच्या प्रवासाचा तिरस्कार करू नका. तुमची वेळही येईल. फक्त चालत राहा. आणि हो, यश मिळवताना माणसं तोडू नका. स्वतः पुढे जाताना दुसऱ्याला खाली खेचू नका. तुमच्या सोबत चालणाऱ्या मित्रांना, कुटुंबाला, शिक्षकांना आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना विसरू नका. कारण, “एकट्याने शिखर गाठता येतं, पण सगळ्यांना सोबत घेऊन वर जाण्यातच खरं मोठेपण असतं.” कधी थकलात, कधी रडलात, कधी स्वतःवरच शंका आली, तर थोडा वेळ थांबा. शांत बसा. स्वतःशी बोला. पण स्वतःचं स्वप्न सोडू नका. कारण तुम्ही आज ज्या स्वप्नासाठी मेहनत घेत आहात. उद्या तेच स्वप्न तुमच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हसू आणणार आहे.

आणि जर अजूनही दिशा ठरली नसेल तर?

काही हरकत नाही. खरंच, काहीच हरकत नाही. प्रत्येकाला १६-१७ व्या वर्षी आयुष्याचं पूर्ण उत्तर सापडतंच असं नाही. काही लोकांना लवकर त्यांचा मार्ग सापडतो, तर काही लोकांना स्वतःला ओळखायला थोडा वेळ लागतो. आणि यात काहीही चुकीचं नाही. कारण आयुष्य ही शर्यत नाही, की सगळ्यांनी एकाच वेळी धावून एकाच ठिकाणी पोहोचलं पाहिजे. 

आजकाल समाज, नातेवाईक, सोशल मीडिया आणि आसपासची माणसं इतका दबाव टाकतात की अनेक विद्यार्थी घाईत निर्णय घेतात. “माझा मित्र इंजिनिअरिंगला जातोय, मीही जातो.” “सगळे मेडिकल करत आहेत, मलाही करायला पाहिजे.” “लोक काय म्हणतील?” “घरी काय बोलतील?” आणि या सगळ्या गोंधळामध्ये खूप वेळा माणूस स्वतःलाच विसरून जातो. म्हणून, घाईत निर्णय घेऊ नका. फक्त मित्र जात आहेत म्हणून एखादा कोर्स निवडू नका. समाज म्हणतो म्हणून स्वतःवर ओझं टाकू नका. लोकांच्या अपेक्षांसाठी स्वतःचं आयुष्य जाळू नका. कारण चुकीच्या दिशेने वेगाने धावण्यापेक्षा योग्य दिशेने हळू चालणं जास्त चांगलं असतं.

स्वतःला वेळ द्या. शांतपणे स्वतःला प्रश्न विचारा मला खरंच काय आवडतं? कोणत्या कामात मला आनंद मिळतो? कोणत्या गोष्टी करताना वेळ कसा जातो हे समजत नाही? मी कोणत्या गोष्टीत सातत्य ठेवू शकतो? मला कसं आयुष्य जगायचं आहे? मला फक्त पैसे कमवायचे आहेत की मनालाही शांतता हवी आहे? मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे का? मला गर्दीत हरवून जायचं आहे की स्वतःची ओळख निर्माण करायची आहे?

उत्तरं लगेच मिळणार नाहीत.  कधी कधी माणूस स्वतःला समजून घ्यायलाच काही वर्षं घेतो. कधी अपयशातून स्वतःचा मार्ग सापडतो. कधी एखाद्या छोट्या अनुभवातून आयुष्याची दिशा बदलते. म्हणून स्वतःवर राग करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, “दिशा ठरली नाही” म्हणजे “तुम्ही मागे आहात” असं नाही. आज खूप लोक दिसायला “सेटल” असतात, पण आतून पूर्ण गोंधळलेले असतात. तर काही लोक शांतपणे स्वतःचा मार्ग शोधत असतात आणि पुढे जाऊन खूप सुंदर आयुष्य जगतात. म्हणून दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका.

या काळात नवीन गोष्टी करून बघा. वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी माहिती घ्या. लोकांशी बोला. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. इंटर्नशिप करा. नवीन कौशल्यं शिका. पुस्तकं वाचा. स्वतःला वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये टाका. कारण, “कधी कधी मार्ग चालायला सुरुवात केल्यानंतरच दिसायला लागतो.” पण या शोधामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा  चुकीच्या वाटेवर जाण्यापासून स्वतःला जपा. जेव्हा मनामध्ये गोंधळ असतो ना, तेव्हा चुकीची माणसं पटकन जवळ येतात. कोणी म्हणेल “चल मजा करू” “हे करून बघ” “सगळेच करतात” “एकदाच आहे” आणि तिथून हळूहळू माणूस चुकीच्या सवयींकडे वळायला लागतो. म्हणून… चुकीच्या संगतीपासून दूर राहा. व्यसनांपासून दूर राहा. स्वतःचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपा. रात्री उशिरापर्यंत फक्त मोबाईलमध्ये हरवून जाऊ नका. स्वतःला एकटं पाडू नका. मनामध्ये काही चालू असेल तर बोला. आई-वडिलांशी बोला. मित्रांशी बोला. शिक्षकांशी बोला. स्वतःच्या भावना मनात दाबून ठेवू नका. आणि हो, तुम्हाला आज सगळं समजणं गरजेचं नाही. हळूहळू आयुष्य स्वतः शिकवतं. अनुभव माणसाला घडवत जातात. वेळ माणसाला मजबूत बनवत जाते. फक्त शोधणं थांबवू नका. कारण जो माणूस स्वतःला शोधत राहतो.  तो एक दिवस स्वतःची सुंदर ओळख नक्की निर्माण करतो. 

राजकारण, नेतृत्व आणि शिक्षणाचं महत्त्व

काही विद्यार्थी दहावी-बारावीनंतर राजकारणाचा मार्ग निवडतील. समाजासाठी काम करण्याचं स्वप्न पाहतील, लोकांचं नेतृत्व करायचं ठरवतील. आणि खरं सांगायचं तर समाजासाठी काम करण्याची इच्छा असणं ही खूप मोठी आणि सुंदर गोष्ट आहे. कारण राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही, तर लोकांच्या समस्या समजून घेणं, त्यांच्यासाठी उभं राहणं आणि समाज बदलण्याची जबाबदारी असते.

पण एक गोष्ट इथे स्पष्टपणे समजून घ्यायला हवी. आजचा काळ पूर्वीसारखा राहिलेला नाही. पूर्वीचा जमाना वेगळा होता. तेव्हा टेक्नॉलॉजी कमी होती. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त बोलणं, भेटणं आणि अनुभव पुरेसा होता. त्या काळात खूप लोक अशिक्षित होते. म्हणून थोडंफार बोलता आलं, लोकांमध्ये फिरता आलं तरी लोक नेता मानायचे. पण आजचा जमाना पूर्णपणे बदललाय. हा AI, टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया, माहिती आणि अपडेट राहण्याचा काळ आहे. आज लोक प्रश्न विचारतात. तथ्य तपासतात. तुमचं बोलणं समजून घेतात. तुमचे विचार, भाषा, ज्ञान आणि निर्णयक्षमता बघतात.

आज जर तुम्हाला लोकांचं नेतृत्व करायचं असेल, तर फक्त मोठमोठ्याने भाषण करून चालत नाही. लोकांना आज असा नेता हवा असतो. जो शिक्षित असेल, ज्याला समाजाची समज असेल, जो टेक्नॉलॉजी समजत असेल, जो जगात काय चाललंय हे जाणत असेल, आणि जो लोकांशी समजूतदारपणे संवाद करू शकत असेल.

पूर्वीच्या काळात अशिक्षित लोकांची संख्या जास्त होती. आज शिक्षित लोकांची संख्या खूप वाढतेय. आज गावातील मुलगाही मोबाईलवर जग बघतोय. लोकं इंटरनेटवर माहिती शोधतात. लोकं प्रश्न विचारतात. लोकं तुलना करतात. म्हणून, आजच्या काळात शिक्षणाशिवाय मोठं नेतृत्व उभं करणं खूप कठीण झालं आहे.

राजकारणात जायचं असेल तर शिक्षण अधिक महत्त्वाचं ठरतं. कारण तिथं तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, कायदे समजून घ्यावे लागतात, समाजाची समस्या समजून घ्यावी लागते, अर्थव्यवस्था, शेती, रोजगार, टेक्नॉलॉजी, शिक्षण यावर बोलावं लागतं, आणि हजारो लोकांसमोर स्वतःचे विचार मांडावे लागतात. हे सगळं फक्त आत्मविश्वासाने होत नाही. त्यासाठी ज्ञान आणि शिक्षण दोन्ही लागतात.

काही लोक म्हणतात  “शिक्षणाशिवायही नेता होता येतं.” हो, होता येतं. पण आजच्या काळात शिक्षण नसताना टिकून राहणं खूप कठीण आहे. कारण आता लोक फक्त आवाज ऐकत नाहीत, तर विचारही ऐकतात. म्हणून जर तुम्हाला राजकारणात जायचं असेल, नेतृत्व करायचं असेल, समाजासाठी काम करायचं असेल तर शिक्षण घ्या. फक्त डिग्रीसाठी नाही, तर स्वतःला घडवण्यासाठी.

लोकांशी कसं बोलायचं, लोकांचं दुःख कसं समजून घ्यायचं, समस्येवर उपाय कसा शोधायचा, लोकांना एकत्र कसं घ्यायचं हे सगळं शिकण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. 

आणखी एक गोष्ट, नेता होणं म्हणजे फक्त प्रसिद्ध होणं नाही. नेता तोच  जो लोकांना योग्य दिशा दाखवतो, जो स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाचा विचार करतो, जो लोकांना जोडतो, आणि जो स्वतः शिकत राहतो. म्हणून जर तुम्हाला उद्या लोकांसमोर उभं राहायचं असेल, तर आज स्वतःला शिक्षित करा. कारण “ज्याच्याकडे ज्ञान असतं, त्याचं बोलणं लोक फक्त ऐकत नाहीत, तर मनापासून मान्यही करतात.”

शिक्षण का महत्त्वाचं आहे? 

आजचा काळ खूप वेगाने बदलतोय. कालपर्यंत जे नवीन होतं, ते आज जुनं होत चाललंय. जग दररोज बदलतंय…

टेक्नॉलॉजी बदलतेय, काम करण्याच्या पद्धती बदलत आहेत, लोकांच्या विचारसरणी बदलत आहेत. हा AI, टेक्नॉलॉजी, स्पर्धा आणि सतत अपडेट राहण्याचा जमाना आहे. आज फक्त “मला येत नाही” “मला कळत नाही” असं म्हणून चालत नाही. कारण जे शिकत राहतात ते पुढे जातात आणि जे थांबतात ते हळूहळू मागे पडायला लागतात. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नाही. फक्त कॉलेजची मार्कशीट, सर्टिफिकेट किंवा नावापुढे लागलेली पदवी म्हणजे शिक्षण नसतं. खरं शिक्षण म्हणजे विचार करण्याची ताकद, योग्य आणि अयोग्य यामधला फरक समजणं, निर्णय घेण्याची क्षमता, लोकांना समजून घेण्याची कला, परिस्थिती हाताळण्याची समज, आणि जगात स्वतःची जागा निर्माण करण्याची हिंमत. तुम्ही किती शिकलेले आहात हे फक्त तुमच्या मार्क्सवरून ठरत नाही, तर तुम्ही लोकांशी कसं बोलता, कसं वागता, कोणाच्या दुःखात उभे राहता का, अपयश आलं तर स्वतःला कसं सावरता. यावरून तुमचं शिक्षण दिसून येतं. 

हो, शिक्षणाशिवायही काही लोक खूप मोठे होतात. काही लोक व्यवसाय उभा करतात.  काही कला, खेळ किंवा अनुभवाच्या जोरावर आयुष्यात मोठं नाव कमावतात. पण त्यासाठी अफाट संघर्ष, अनुभव, शिस्त आणि जग समजण्याची ताकद लागते. आणि प्रत्येकाला तो मार्ग जमेलच असं नाही. म्हणून शक्य असेल तिथपर्यंत शिक्षण घ्या.
स्वतःला शिकवत राहा. स्वतःला अपडेट ठेवा.

आज जगात AI आलंय. मोबाईलमध्ये एका क्लिकवर माहिती मिळते. नवीन नवीन स्किल्स रोज तयार होत आहेत. म्हणून फक्त पुस्तकातलं शिक्षण पुरेसं राहिलेलं नाही. आज तुम्हाला  कम्युनिकेशन शिकावं लागेल, टेक्नॉलॉजी समजून घ्यावी लागेल, स्वतःचे विचार मांडता आले पाहिजेत, नवीन गोष्टी पटकन शिकता आल्या पाहिजेत, आणि वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करता आला पाहिजे. 

आणखी एक गोष्ट, शिक्षण तुम्हाला फक्त पैसे कमवायला शिकवत नाही, तर आयुष्य जगायलाही शिकवतं. ते तुम्हाला नम्र राहायला शिकवतं. लोकांचा आदर करायला शिकवतं. प्रश्न विचारायला शिकवतं. आणि चुकीच्या लोकांपासून सावध राहायलाही शिकवतं. आज सोशल मीडियावर खूप लोक दिसतील जे म्हणतील “शिक्षणाची गरज नाही.” “कॉलेज सोडा.” “फक्त पैसे कमवा.” पण लक्षात ठेवा  पटकन पैसा मिळवणं आणि आयुष्यभर सन्मानाने जगणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानाशिवाय मिळालेला पैसा अनेकदा माणसाला चुकीच्या वाटेवर घेऊन जातो. म्हणून शिक्षणाला कधीही कमी समजू नका. तुम्ही डॉक्टर बना, इंजिनिअर बना, कलाकार बना, शेतकरी बना, व्यवसायिक बना काहीही बना, पण शिकणं कधी थांबवू नका. कारण जो माणूस शिकणं थांबवतो. तो हळूहळू वाढणंही थांबवतो. आणि हो,

फक्त पुस्तकातलं ज्ञान घेऊन उपयोग नाही. जगाकडूनही शिका. लोकांच्या अनुभवातून शिका, आई-वडिलांच्या संघर्षातून शिका, शिक्षकांच्या शब्दांतून शिका, स्वतःच्या चुका मान्य करून त्यातून शिका. कारण, “शिक्षण तुम्हाला नोकरी देऊ शकतं, पण समज तुम्हाला माणूस बनवते.” म्हणून स्वतःला वेळोवेळी अपडेट करत राहा. नवीन गोष्टी शिकत राहा. प्रश्न विचारत राहा. आणि आयुष्यभर विद्यार्थी राहा. कारण, “ज्याला शिकण्याची भूक असते, त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही.” 

मोबाईल तुमचा मित्र की शत्रू?

तुमच्या हातात आज जगातील सर्वात मोठी ताकद आहे तुमचा मोबाईल. पूर्वी लोकांना माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं शोधावी लागायची, ग्रंथालयात जावं लागायचं, अनुभवी लोकांना भेटावं लागायचं. पण आज संपूर्ण जग तुमच्या हातात आहे. एका क्लिकवर तुम्ही नवीन कौशल्य शिकू शकता, जगभरातील लोकांशी जोडले जाऊ शकता, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, पैसे कमवायला शिकू शकता, किंवा तुमचं भविष्य बदलू शकता पण जितकी मोठी ताकद, तितकी मोठी जबाबदारी. हा मोबाईल तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो.  आणि त्याच ताकदीने तुमचं आयुष्य हळूहळू खालीही खेचू शकतो. हे पूर्णपणे तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर अवलंबून आहे.

आज खूप विद्यार्थी मोबाईल वापरतात, पण खूप कमी विद्यार्थी मोबाईलचा योग्य उपयोग करतात. तासन् तास रील्स पाहणं, दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजणं, गेम्समध्ये हरवून जाणं, रात्री उशिरापर्यंत स्क्रीनसमोर बसणं,  या सगळ्या गोष्टी सुरुवातीला मजा वाटतात. पण हळूहळू त्या वेळ खातात, आत्मविश्वास कमी करतात, लक्ष विचलित करतात, आणि माणसाला स्वतःपासून दूर नेतात. म्हणून मोबाईलचा वापर शिकण्यासाठी करा, नवीन कौशल्यांसाठी करा, जग समजून घेण्यासाठी करा, चांगले व्हिडिओ, पॉडकास्ट आणि पुस्तकं ऐकण्यासाठी करा, तुमच्या करिअरविषयी माहिती मिळवण्यासाठी करा, स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी करा. फक्त वेळ घालवण्यासाठी नाही.

आज मोबाईलवरून तुम्ही Coding शिकू शकता, Editing शिकू शकता, Graphic Design शिकू शकता, AI शिकू शकता, Language शिकू शकता, Business शिकू शकता, Communication Skill सुधारू शकता. म्हणजे मोबाईल फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर तो तुमच्या भविष्याचा गुरुही बनू शकतो. पण त्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे  “मोबाईल तुमच्या हातात असला पाहिजे, तुम्ही मोबाईलच्या हातात नाही.” सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट मोबाईल पाहणं, जेवताना मोबाईल, अभ्यास करताना मोबाईल,  झोपताना मोबाईल हे हळूहळू व्यसन बनायला लागतं. आणि कोणतंही व्यसन माणसाची शांतता हिरावून घेतं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक आयुष्य खरं नसतं. लोक तिथं त्यांचा आनंद दाखवतात. त्यांचं यश दाखवतात. त्यांचे महागडे फोन, कपडे, गाड्या दाखवतात, पण त्यामागचा संघर्ष, एकटेपणा, ताण आणि दुःख फार कमी लोक दाखवतात. म्हणून दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका. स्वतःला एकटं पाडू नका. सतत रूममध्ये बंद राहणं, कोणाशी न बोलणं, फक्त मोबाईलमध्ये हरवून जाणं, हे मनाला अजून थकवत जातं, थोडं बाहेर पडा.

मोबाईलचा चुकीचा वापर तुम्हाला चुकीच्या लोकांपर्यंत, चुकीच्या सवयींपर्यंत, चुकीच्या विचारांपर्यंत, आणि कधी कधी चुकीच्या आयुष्यापर्यंतही घेऊन जाऊ शकतो. म्हणून स्वतःला सतत विचारत राहा  “मी मोबाईल वापरतोय, की मोबाईल मला वापरतोय?”

एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ ही आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसे परत कमावता येतात, पण वाया गेलेला वेळ परत मिळत नाही. म्हणून दिवसातून किती वेळ मोबाईलवर जातोय याचं भान ठेवा आणि हो, कधी कधी मोबाईल बाजूला ठेवूनही जगायला शिका. आई-वडिलांशी बोला, मित्रांसोबत मनमोकळं हसा, निसर्गात फिरा, पुस्तक वाचा, स्वतःसोबत वेळ घाला. कारण, खरी शांतता स्क्रीनमध्ये नाही. तर ती आपल्या माणसांमध्ये आणि स्वतःमध्ये असते.

तुमचा मोबाईल तुम्हाला काय बनवेल  हे त्याच्या किंमतीवर नाही, तर तुम्ही त्याचा किती समजूतदारपणे वापर करता यावर ठरतं.

मित्र, मैत्री आणि आकर्षण

या वयात आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं. नवीन कॉलेज, नवीन वातावरण, नवीन लोक, नवीन स्वप्नं आणि याच प्रवासात तुम्हाला खूप मित्र भेटतील. मैत्रिणी भेटतील. नवीन नाती तयार होतील. काही लोक काही दिवसांसाठी आयुष्यात येतील, तर काही लोक आयुष्यभरासाठी आठवण बनून राहतील. म्हणून मैत्री करा, लोकांशी बोला, लोकांना समजून घ्या, नवीन नात्यांना घाबरू नका. कारण माणूस माणसांमधूनच शिकत असतो.

एक चांगला मित्र तुमच्या कठीण काळात उभा राहतो, तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतो, तुमचं मन समजून घेतो, आणि गरज पडली तर तुमच्या चुका देखील दाखवतो. म्हणून मित्र निवडताना फक्त मजा पाहू नका, तर त्यांची विचारसरणी, वागणूक आणि सवयीही बघा. कारण, “तुमच्या सोबतची माणसं तुमचं भविष्य घडवत असतात.”

या वयात आकर्षण होणं अगदी स्वाभाविक आहे. कोणाच्या चेहऱ्यावर, आवाजावर, स्वभावावर, बोलण्यावर किंवा काळजी घेण्याच्या पद्धतीवर मन जडतं. एखाद्याशी बोलताना आनंद वाटतो. त्यांचा मेसेज आला की चेहऱ्यावर हसू येतं. हे सगळं सुंदर आहे आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतंच.

पण प्रत्येक आकर्षण हे प्रेम नसतं आणि प्रत्येक नातं आयुष्यभर टिकणारच असंही नसतं. म्हणून भावना सुंदर असल्या तरी निर्णय शांत डोक्याने घ्यायला शिका. आजकाल सोशल मीडियामुळे आणि सिनेमांमुळे खूप वेळा नात्यांचं चुकीचं चित्र दाखवलं जातं. जणू रिलेशनशिपमध्ये असणं म्हणजेच “कूल” असणं, जणू कोणीतरी असलंच पाहिजे आयुष्यात, पण खरं सांगायचं तर  स्वतःला हरवून मिळालेलं कोणतंही नातं सुंदर नसतं. जर एखाद्या नात्यामुळे  तुमचं शिक्षण बिघडत असेल, आई-वडिलांपासून तुम्ही दूर जात असाल, तुम्ही खोटं बोलायला लागला असाल, तुमची शांतता हरवत असेल, किंवा तुमचं भविष्य धोक्यात येत असेल, तर थांबून विचार करणं गरजेचं आहे.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा  “क्षणिक आकर्षणासाठी कायमचं भविष्य खराब होऊ देऊ नका.” या वयात भावना खूप तीव्र असतात. कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीला पूर्ण जग समजू लागतो. पण आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती फिरत नाही. तुमच्याकडे  आई-वडिलांची स्वप्नं आहेत, स्वतःचं भविष्य आहे, करिअर आहे, आणि अजून खूप मोठं आयुष्य बाकी आहे. म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका. प्रत्येक भावना लगेच व्यक्त करणं गरजेचं नसतं.  प्रत्येक नात्यात लगेच गुंतणं योग्य नसतं. आणि प्रत्येक “मला तुझी काळजी आहे” म्हणणारी व्यक्ती खरीच असेल असंही नसतं. लोकांना समजून घ्यायला वेळ द्या.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कोणासाठीही स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. जो माणूस खरंच तुमच्यावर प्रेम करतो किंवा तुमची काळजी घेतो. तो तुमच्या स्वप्नांचा आदर करेल, तुमचं शिक्षण समजून घेईल, तुमच्या मर्यादा मान्य करेल, आणि तुम्हाला पुढे जायला मदत करेल. जो तुम्हाला चुकीच्या गोष्टींकडे ढकलतो. आई-वडिलांपासून दूर करतो. खोटं बोलायला लावतो.  तो तुमच्या आयुष्यासाठी योग्य माणूस नाही. मैत्री करा, प्रेम करा, नाती जपा, पण त्याचवेळी स्वतःचं भविष्य, स्वतःची ओळख आणि स्वतःची स्वप्नं विसरू नका. कारण योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णयच पुढे जाऊन सुंदर आयुष्य घडवतात. 

आणि हो, कधी मन दुखावलं, कोणीतरी सोडून गेलं, मैत्री तुटली किंवा नातं टिकून राहिलं नाही, तर स्वतःला संपवून टाकण्याइतकं कोणतंच नातं मोठं नसतं हे कायम लक्षात ठेवा. लोक येतात, लोक जातात, पण आयुष्य थांबत नाही. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या,  आणि योग्य माणसांची योग्य वेळी कदर करायला शिका. 

हॉस्टेल, घरापासून दूर राहणं आणि आयुष्य शिकणं

जे विद्यार्थी आता शिक्षणासाठी घरापासून दूर जाणार आहेत. हॉस्टेलवर राहणार आहेत. रूम करून राहणार आहेत. त्यांच्यासाठी हा आयुष्यातला खूप मोठा बदल असणार आहे. सुरुवातीला सगळंच नवीन वाटेल. नवीन शहर, नवीन लोक, नवीन रूम, नवीन वातावरण आणि त्या सगळ्यामध्ये अचानक एकटेपणा जाणवायला लागेल. आईची आठवण येईल, घरचं जेवण आठवेल, रात्री शांततेत घरची माणसं आठवतील, सण-उत्सवाला घरापासून दूर असल्याची खंत वाटेल, कधी रूममध्ये बसून नकळत डोळ्यात पाणीही येईल. हे सगळं अगदी सामान्य आहे. कारण घर सोडून बाहेर पडताना फक्त जागा बदलत नाही, तर माणूस हळूहळू स्वतःला घडवायला सुरुवात करत असतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हार मानू नका. सुरुवातीच्या अडचणी म्हणजे चुकीचा निर्णय नाही. प्रत्येक मोठा माणूस कधीतरी घरापासून दूर राहूनच मजबूत बनलेला असतो. जग जिंकायचं असेल तर जगाच्या मैदानात उतरावंच लागतं.

सुरुवातीला कधी जेवण आवडणार नाही, कधी रूममेट समजणार नाही, कधी अभ्यासाचा ताण येईल, कधी “घरी जावंसं वाटतंय” असं मनात येईल, पण हळूहळू तुम्ही सगळं शिकायला लागाल. स्वतःची काळजी घेणं, वेळ सांभाळणं, पैसे जपून वापरणं, स्वतःचे निर्णय घेणं, आणि स्वतःला सांभाळणं. हीच खरी आयुष्याची शाळा असते.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट, घरापासून दूर गेल्यावर चुकीच्या सवयी खूप पटकन जवळ येतात. कारण तिथं सतत लक्ष ठेवणारे आई-वडील नसतात. कोणी अभ्यासासाठी ओरडणार नसतं. कोणी रात्री उशिरा बाहेर फिरायला थांबवणार नसतं. म्हणून स्वतःच स्वतःचं रक्षण करायला शिका. चुकीच्या संगतीपासून दूर राहा,  व्यसनांपासून दूर राहा, “सगळे करतात” म्हणून काहीही करू नका, रात्रीचं स्वातंत्र्य म्हणजे चुकीचं वागण्याची परवानगी नाही हे लक्षात ठेवा. कारण, एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक वर्षांची मेहनत खराब होऊ शकते.

आणि हो, आई-वडिलांना फोन करून फक्त रडू नका. त्यांना सतत “मला करमत नाही ” “मला घरी यायचंय ” असं सांगत बसू नका. कारण तुमचा फोन ठेवल्यानंतर तेही रात्रभर तुमची काळजी करत बसतात. तुम्ही त्यांचा जीव असता. तुमचा आवाज ऐकूनच त्यांना समाधान मिळत असतं. म्हणून त्यांना सांगा “आज मी नवीन काही शिकलो.” “आज मला मजा आली.” “आज मी स्वतः काहीतरी केलं.” “आज मी स्वतःची काळजी घेतली.” “आज मी एका अडचणीला स्वतः सामोरं गेलो.” कारण तुमच्या आनंदातच त्यांचं खरं सुख असतं.

एक दिवस असा येईल. जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल आणि लक्षात येईल हॉस्टेलने तुम्हाला फक्त शिक्षण दिलं नाही, तर आयुष्य जगायला शिकवलं. तिथं तुम्ही लोक ओळखायला शिकलात, स्वतःची किंमत समजली, दुःख लपवून हसायला शिकलात, कमी पैशात निभावून न्यायला शिकलात, आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलात. म्हणून हा काळ फक्त “सहन” करू नका, तर “जगा”. मित्र बनवा. आठवणी तयार करा. पण त्याचवेळी स्वतःचं ध्येय विसरू नका.

आणखी एक गोष्ट, जेव्हा कधी खूप एकटं वाटेल ना, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या  “मी इथं फक्त घरापासून दूर राहायला आलो नाही, तर माझ्या स्वप्नांच्या जवळ जायला आलो आहे.” आणि मग पुन्हा नव्या ताकदीने उभे रहा.

शिक्षक, मार्गदर्शक आणि योग्य माणसं ओळखा

आयुष्यात पुढे जाताना तुम्हाला खूप लोक भेटतील. काही शिक्षक म्हणून, काही मित्र म्हणून, काही मार्गदर्शक म्हणून, तर काही लोक असेही भेटतील जे तुमच्यावर खूप प्रभाव टाकतील. काही लोक तुमचं आयुष्य घडवतील, तर काही लोक नकळत तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. म्हणून “कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे.”

शिक्षक म्हणजे फक्त पुस्तक शिकवणारी व्यक्ती नसते. खरा शिक्षक तो असतो. जो तुम्हाला विचार करायला शिकवतो, जो तुमच्या चुका समजावून सांगतो, जो तुमच्यातला आत्मविश्वास वाढवतो, आणि जो तुम्हाला फक्त परीक्षेसाठी नाही, तर आयुष्यासाठी तयार करतो. 

अशा लोकांचा आदर करा. त्यांच्याकडून शिका. त्यांच्या अनुभवांचं महत्त्व समजा.

कारण, आयुष्यात योग्य वेळी मिळालेलं योग्य मार्गदर्शन अनेक चुका वाचवून जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमचं भलं इच्छितेच असं नाही. आजच्या काळात काही लोक स्वतःचा फायदा पाहून जवळ येतात, चुकीच्या गोष्टी “Cool” असल्यासारख्या दाखवतात, किंवा तुमच्या गोंधळाचा फायदा घेतात. म्हणून कोणाच्याही प्रभावाखाली लगेच जाऊ नका. लोकांचं बोलणं ऐका, पण स्वतःचं डोकं वापरायला विसरू नका.

प्रश्न विचारत राहा. “हे का?” “हे योग्य आहे का?” “याचा पुढे काय परिणाम होईल?” “हा मार्ग मला खरंच पुढे नेईल का?” हे प्रश्न स्वतःला विचारायला शिका. कारण प्रश्न विचारणारा माणूसच योग्य दिशा शोधू शकतो.

मार्गदर्शन घ्या. तुमच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या लोकांशी बोला.  ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रातील लोकांना भेटा. त्यांचे संघर्ष ऐका. त्यांच्या चुका समजून घ्या. कारण कधी कधी दुसऱ्यांचा अनुभव आपल्याला मोठ्या अडचणींपासून वाचवतो. पण मार्गदर्शन घेणं आणि आंधळेपणाने कोणाचं ऐकणं. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कोणी काही सांगितलं म्हणून ते लगेच खरं मानू नका. स्वतः विचार करा. स्वतः समजून घ्या. स्वतः अनुभव घ्या. कारण शेवटी आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कधी तुम्हाला एखादी व्यक्ती भेटेल जी तुमच्यावर विश्वास ठेवेल. तुम्हाला पुढे जायला प्रेरणा देईल. तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत उभी राहील. अशा लोकांना आयुष्यात जपा.

कारण योग्य माणसं ही आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती असतात. आणि हो,  वाईट लोक ओळखायलाही शिका. जे लोक सतत दुसऱ्यांची टिंगल करतात, चुकीच्या गोष्टींकडे ढकलतात, तुमच्या स्वप्नांवर हसतात, तुमचा आत्मविश्वास कमी करतात, किंवा तुम्हाला आई-वडिलांपासून, अभ्यासापासून आणि चांगल्या गोष्टींपासून दूर नेतात. त्यांच्यापासून हळूहळू अंतर ठेवायला शिका. कारण, चुकीची माणसं अनेकदा चुकीच्या सवयींपेक्षा जास्त नुकसान करतात.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात कोण येतं यापेक्षा, तुम्ही कोणाला तुमच्या आयुष्यात जागा देता हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून माणसं निवडताना घाई करू नका.

आणि शेवटी, प्रश्न विचारत राहा. शिकत राहा. मार्गदर्शन घेत राहा. पण स्वतःचा विचार बंद करू नका. कारण जो माणूस स्वतः विचार करायला शिकतो. तो आयुष्यात कुठल्याही गर्दीत हरवत नाही.

सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक ताकद

या जगात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारची ऊर्जा असते.

हे फक्त पुस्तकातलं वाक्य नाही, तर आयुष्यात दररोज जाणवणारी गोष्ट आहे. काही लोक तुमच्याशी बोलले की मनाला शांत वाटतं, उभारी मिळते, स्वतःवर विश्वास वाढतो, तर काही लोक असे भेटतात की त्यांच्या दोन शब्दांनीही मन खचून जातं. म्हणून आयुष्यात एक गोष्ट शिकणं खूप महत्त्वाचं आहे.  “कोणत्या लोकांमध्ये राहिल्यावर तुमची ऊर्जा वाढते. आणि कोणत्या लोकांमुळे तुम्ही आतून तुटायला लागता.”

तुम्हाला कमी लेखणारे लोक भेटतील. टोमणे मारणारे भेटतील. तुमच्या स्वप्नांवर हसणारे भेटतील. तुम्ही काहीतरी चांगलं करायला लागलात की तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करणारेही भेटतील. कधी म्हणतील “तुझ्याने नाही होणार.” “तू खूप साधा आहेस.” “तुझ्यात ते टॅलेंट नाही.” “हे स्वप्न तुझ्यासाठी नाही.” पण त्यांना उत्तर शब्दांनी देऊ नका, कारण शब्दांमधली भांडणं काही काळापुरती असतात, पण कृतीतून दिलेलं उत्तर आयुष्यभर लक्षात राहतं.

तुमच्या मेहनतीतून उत्तर द्या. तुमच्या सातत्यातून उत्तर द्या. तुमच्या शांततेतून उत्तर द्या. लोक काय बोलतात यापेक्षा, तुम्ही स्वतःला काय सांगता हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून स्वतःशी चांगलं बोलायला शिका. “मी करू शकतो.” “मी शिकतोय.” “मी कालपेक्षा आज चांगला आहे.” “चुका झाल्या तरी मी पुन्हा उभा राहीन.” ही सकारात्मक ऊर्जा मनामध्ये तयार करा. कारण मजबूत मन असलेला माणूसच आयुष्यात मोठे वादळं पार करू शकतो.

लक्षात ठेवा. छोटं यशही साजरं करा. एखादा कठीण प्रश्न सुटला? आज अभ्यास व्यवस्थित झाला? एखाद्या भीतीवर मात केली? नवीन काही शिकलात? एखाद्याला मदत केली? तर स्वतःचं कौतुक करा. कारण छोट्या छोट्या गोष्टीच पुढे जाऊन मोठा आत्मविश्वास तयार करतात. आपण खूप वेळा फक्त मोठ्या यशाची वाट पाहत बसतो. आणि त्यामुळे रोज जिंकलेल्या छोट्या लढाया विसरून जातो. पण खरं सांगायचं तर  मोठं यश हे छोट्या छोट्या प्रयत्नांचंच एकत्रित रूप असतं.

रोज काहीतरी नवीन शिका. आज जर एका दिवसात तुम्ही एखादा नवीन शब्द शिकलात,नवीन विचार समजला, स्वतःची एखादी चूक ओळखली, किंवा एखाद्या परिस्थितीत शांत राहायला शिकलात, तरी तो दिवस वाया गेलेला नाही.

आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट, स्वतःला वेळ द्या. आजकाल लोक इतके धावत आहेत की स्वतःसोबत बसायलाच वेळ राहत नाही. कधी शांत बसा. स्वतःशी बोला. मनात काय चाललंय ते समजून घ्या. सतत मजबूत असल्याचं दाखवण्याची गरज नसते. कधी थकलात, कधी रडलात, कधी मन खचलं, तर स्वतःला दोष देऊ नका. कारण मानसिक थकवा हा देखील खरा असतो. मदत मागायला शिका. मनात खूप काही साचलं असेल तर आई-वडिलांशी बोला, मित्रांशी बोला, शिक्षकांशी बोला, किंवा स्वतःच्या डायरीमध्ये लिहा. पण मनातलं दुःख एकट्यानं सहन करत बसू नका.

आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. सतत नकारात्मक गोष्टी पाहणं, ऐकणं आणि विचार करणं मन कमकुवत करतं. म्हणून सतत तुलना करणाऱ्या लोकांपासून दूर राहा, सतत तक्रार करणाऱ्या लोकांपासून सावध राहा, आणि स्वतःला कमी लेखणाऱ्या वातावरणात जास्त वेळ घालवू नका.

तुमच्या आयुष्यात अशी माणसं ठेवा. जी तुम्हाला पुढे जायला प्रेरणा देतील. जी चुका दाखवतील पण साथही देतील, जी तुमच्या स्वप्नांवर हसणार नाहीत. कारण, सकारात्मक माणसं आयुष्य सुंदर बनवतात.

आणि शेवटी, रोज रात्री झोपताना स्वतःला एक प्रश्न विचारा “आज मी कालपेक्षा थोडा चांगला बनलो का?” जर उत्तर “हो” असेल, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण “आजचा दिवस व्यर्थ गेला नाही” हे समाधान देणारी झोप खूप सुंदर असते.

नम्रता - सर्वात मोठी ताकद

आजच्या काळात पैसा कमावणं शक्य आहे. प्रसिद्धी मिळवणं शक्य आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवणंही शक्य आहे.  लोक तुमचं नाव ओळखू शकतात.  तुमच्या यशाबद्दल बोलू शकतात. तुमच्या फोटोवर टाळ्या वाजवू शकतात, पण “नम्र माणूस बनणं” हेच खरं मोठेपण आहे. कारण पैसा, प्रसिद्धी आणि यश हे सगळं वेळेनुसार बदलू शकतं, पण माणुसकी आणि नम्रता  हीच गोष्ट माणसाला कायम मोठं बनवते.

तुमच्याकडे ज्ञान असेल, पैसा असेल,  मोठी पदवी असेल, मोठं नाव असेल, पण जर समोरच्याचा आदर नसेल,  लोकांशी प्रेमाने बोलता येत नसेल, गरीब, लहान किंवा कमकुवत माणसाला कमी लेखत असाल, तर त्या सगळ्या यशाला काही अर्थ राहत नाही.

आजकाल खूप लोक यश मिळाल्यानंतर बदलून जातात. थोडे पैसे आले, थोडं नाव झालं, लोक ओळखायला लागले, की काही लोकांना वाटायला लागतं “आता मी मोठा झालो.” आणि तिथूनच माणूस आतून छोटा व्हायला सुरुवात होते.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. झाडावर जितकी फळं जास्त लागतात. तितकं ते झाड खाली झुकतं. तसंच खरं मोठेपण माणसाला शांत, संयमी आणि नम्र बनवतं. नम्र राहणं म्हणजे स्वतःला कमी समजणं नाही. नम्रता म्हणजे समोरच्याचा आदर करणं, स्वतःपेक्षा लहान माणसालाही माणूस म्हणून मान देणं, चूक झाली तर ती मान्य करणं, आणि कितीही मोठं झालो तरी शिकत राहणं. 

तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा, डॉक्टर व्हा, अधिकारी व्हा, व्यवसायिक व्हा, कलाकार व्हा, पण घरी आल्यावर आई-वडिलांशी प्रेमाने बोलता आलं पाहिजे. शिक्षकांना भेटल्यावर नमस्कार करता आला पाहिजे. ज्यांनी तुम्हाला सुरुवातीला साथ दिली त्यांना विसरता कामा नये. कारण माणूस किती उंच गेला यापेक्षा, तो उंच गेल्यावर किती जमिनीवर राहिला हे जास्त महत्त्वाचं असतं.

आणखी एक गोष्ट, कधीही कोणाला कमी समजू नका. आज जो माणूस छोट्या कामावर आहे. तो उद्या तुमच्यापेक्षा खूप मोठा होऊ शकतो. आणि आज तुम्ही पुढे असाल. उद्या परिस्थिती बदलूही शकते. म्हणून प्रत्येकाशी आदराने वागा. तुमच्या बोलण्यामध्ये नम्रता असू द्या. कारण काही लोक तुमचा चेहरा विसरतील. तुमचं नाव विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी कसं बोललात हे कधी विसरणार नाहीत.

आज सोशल मीडियावर खूप लोक “अटिट्यूड” दाखवतात. उद्धटपणाला “स्टाईल” समजलं जातं. पण खरं सांगायचं तर  उद्धटपणाने लोक घाबरतात. नम्रतेने लोक जोडले जातात. आणि आयुष्यात माणसं जोडणारा माणूसच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो.

यश मिळालं की डोकं शांत ठेवायला शिका. अपयश आलं की स्वतःला सावरायला शिका. दोन्ही वेळेला नम्र राहणं हीच खरी ताकद असते.

आणि शेवटी, तुमच्या ज्ञानामुळे लोक तुम्हाला ओळखतील. तुमच्या यशामुळे लोक तुमचं कौतुक करतील, पण तुमच्या नम्रतेमुळे लोक तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतील.

शेवटी एकच सांगायचं आहे…

प्रिय विद्यार्थ्यांनो,

तुमचा प्रवास अजून खूप मोठा आहे. दहावी-बारावी हा शेवट नाही. तो फक्त आयुष्याच्या एका नवीन प्रवासाचा पहिला दरवाजा आहे. आत्तापर्यंत तुम्ही पुस्तकांमधले धडे शिकलात.  आता आयुष्य तुम्हाला माणसं, परिस्थिती, संघर्ष, अपयश आणि अनुभव यांच्यातून शिकवणार आहे. कधी सगळं तुमच्या मनासारखं होईल, तर कधी काहीच आपल्या हातात नाही असं वाटेल. चुका होतील, अपयश येईल, लोक बोलतील, कधी जवळची माणसंही गैरसमज करतील, कधी स्वतःवरच शंका येईल, कधी “मी खरंच योग्य चाललोय का?” हा प्रश्न मनाला त्रास देईल. पण स्वतःवरचा विश्वास कधी सोडू नका. कारण आयुष्यातील प्रत्येक मोठा माणूस कधीतरी गोंधळलेला असतो.  प्रत्येक यशस्वी माणूस कधीतरी अपयशी झालेला असतो.  आणि प्रत्येक मजबूत माणूस कधीतरी आतून तुटलेलाही असतो. फरक फक्त एवढाच असतो.  काही लोक परिस्थितीसमोर हार मानतात.  आणि काही लोक परिस्थितीला हरवायला शिकतात.

म्हणून पडला तरी पुन्हा उठा, हरलात तरी पुन्हा प्रयत्न करा, लोकांनी हसवलं तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा.

कारण “हळूहळू चालणारा माणूसही पुढे जात असतो, जोपर्यंत तो जिंकत नाही.”

आणखी एक गोष्ट, यश म्हणजे फक्त मोठी नोकरी, पैसा किंवा प्रसिद्धी नाही. यश म्हणजे आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान, स्वतःच्या मनाला मिळालेली शांतता, चुकीच्या मार्गावर न जाता प्रामाणिकपणे पुढे जाणं, आणि कोणाच्या आयुष्यात तरी चांगला बदल घडवणं. 

तुमच्या आयुष्यात एक दिवस असा नक्की येईल, जेव्हा तुमच्या संघर्षाची गोष्ट कोणीतरी ऐकेल, तुमच्या मेहनतीतून कोणीतरी प्रेरणा घेईल, तुमच्याकडे बघून कोणीतरी स्वतःला सावरायला शिकेल, कोणीतरी मनापासून म्हणेल “मलाही त्या व्यक्तीसारखं बनायचं आहे.” आणि विश्वास ठेवा. त्या दिवशी तुमचं खरं यश सुरू होईल. म्हणून मोठी स्वप्नं बघा. पण माणुसकी विसरू नका. मोठं व्हा, पण नम्र राहा. पुढे जा, पण सोबतच्या माणसांना विसरू नका. स्वतःसाठी जगा, पण इतरांच्या आयुष्यातही प्रकाश बनण्याचा प्रयत्न करा.

आणि शेवटी, कधी आयुष्य खूप कठीण वाटलं ना, तर फक्त इतकं लक्षात ठेवा  “हा काळ कायमचा नाही. आणि मीही इतका कमकुवत नाही.” स्वतःवर विश्वास ठेवा. आई-वडिलांचा आशीर्वाद सोबत ठेवा, शिकत राहा, चालत राहा, हसत राहा, कारण तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट अजून घडायची बाकी आहे. 

All The Best, My Dears....❤️

___________________________________________________________________________________

पालकांसाठी  

प्रिय आई-वडिलांनो,

तुमच्या मुलांनी आज त्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा पूर्ण केला आहे. दहावी-बारावीचा निकाल हा फक्त मुलांचा नाही, तर तुमच्या त्यागाचा, काळजीचा, मेहनतीचा आणि प्रेमाचा देखील निकाल असतो. तुम्ही त्यांच्या मागे उभं राहिलात. त्यांच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्यात. त्यांच्या शिक्षणासाठी कष्ट केलेत. त्यांच्या प्रत्येक छोट्या यशात आनंद मानलात आणि प्रत्येक अपयशात त्यांना सावरलंत. म्हणून सर्वप्रथम तुमचंही मनापासून अभिनंदन.

पण आता तुमच्या मुलांना फक्त मार्क्सपेक्षा जास्त गरज आहे. समजून घेणाऱ्या माणसांची. कारण या वयात मुलं फक्त अभ्यासाशी लढत नसतात, तर स्वतःला शोधत असतात. त्यांच्या मनात भविष्याची भीती असते, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड असते, समाजाचं प्रेशर असतं, तुलना असते, आणि अनेक वेळा एकटेपणाही असतो. पण ते प्रत्येक वेळी हे सगळं बोलून दाखवतीलच असं नाही. कधी कधी मुलं शांत असतात, पण त्यांच्या मनात खूप काही चालू असतं. म्हणून फक्त “किती मार्क्स आले?” हे विचारू नका. कधी शांतपणे त्यांच्या जवळ बसा आणि विचारा  “तू ठीक आहेस ना?” “तुला काही बोलायचं आहे का?” “तुला कसली भीती वाटतेय का?” विश्वास ठेवा. तुमचं ऐकून घेणं हे त्यांच्या अर्ध्या समस्यांचं उत्तर असतं.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. कोणीतरी अभ्यासात चांगला असेल, कोणीतरी कला, खेळ, व्यवसाय किंवा इतर गोष्टींमध्ये चांगला असेल. म्हणून त्यांची तुलना दुसऱ्या मुलांशी करू नका. “शेजारच्या मुलाला इतके मार्क्स आले” “तो बघ किती पुढे गेला” “तू का नाही करू शकत?” ही वाक्यं अनेकदा मुलांचा आत्मविश्वास आतून तोडतात. तुलना प्रेरणा कमी आणि मानसिक ताण जास्त देते.

तुमची अपूर्ण स्वप्नं त्यांच्यावर लादू नका. तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून मुलाने डॉक्टरच व्हावं, तुम्हाला इंजिनिअर व्हायचं होतं म्हणून त्याने तेच करावं, असं प्रत्येक वेळी गरजेचं नसतं. कारण  मुलं तुमच्या आयुष्याची कॉपी नसतात. त्यांचं स्वतःचं एक वेगळं आयुष्य असतं. त्यांना त्यांचा मार्ग शोधू द्या. त्यांच्या चुका त्यांना करू द्या. कारण कधी कधी चुका देखील माणसाला खूप मोठं शिकवून जातात.

आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट, या वयात मुलांना ओरडण्यापेक्षा “सोबत” जास्त हवी असते. जेव्हा मुलं चुकीच्या वाटेवर जातात ना, तेव्हा त्यामागे अनेकदा भीती, एकटेपणा, ताण किंवा संवादाचा अभाव असतो. म्हणून मुलांशी मैत्री करा. त्यांना इतकं सुरक्षित वाटू द्या, की ते त्यांच्या चुका तुमच्याशी शेअर करू शकतील, त्यांच्या भावना बोलू शकतील, आणि कोणतीही गोष्ट लपवण्याची गरज त्यांना वाटणार नाही.

आजच्या काळात सोशल मीडिया, चुकीची संगत, मानसिक ताण आणि स्पर्धा खूप वाढली आहे. म्हणून मुलांवर फक्त नियंत्रण ठेवू नका, तर त्यांना समजून घ्या. त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या छोट्या प्रयत्नांचंही कौतुक करा, ते हरले तर त्यांना दोष देऊ नका, तर पुन्हा उभं राहायला शिकवा.

आणखी एक गोष्ट, कधी कधी मुलं तुमच्याशी उद्धटपणे बोलतील, राग करतील, दूर राहतील, पण विश्वास ठेवा. त्यांना अजूनही तुमच्या प्रेमाची आणि आधाराची गरज असते. या वयात ते स्वतःलाच समजून घेत असतात. म्हणून रागापेक्षा संवाद निवडा.

आणि शेवटी, एक दिवस तुमचं मूल खूप मोठं होईल, मोठ्या पदावर जाईल, पैसा कमवेल, पण त्या सगळ्यापेक्षा सुंदर गोष्ट ही असेल, की ते एक चांगलं माणूस बनलेलं असेल. म्हणून त्यांना फक्त यशस्वी बनवू नका. त्यांना  नम्र बनवा, संवेदनशील बनवा, प्रामाणिक बनवा, आणि स्वतःसोबत इतरांनाही घेऊन चालणारा माणूस बनवा.

कारण “मोठं होणं सोपं आहे, पण चांगलं माणूस बनणं  हेच खरं यश आहे.” 

आणि तुमच्या भाषेत सांगायच झाल तर,

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.  तुमचं मूल ही फक्त तुमची जबाबदारी नसते, तर ती एका नवीन पिढीची सुरुवात असते. प्रत्येक पिढी नवीन विचार घेऊन जन्माला येत असते. जसा तुमच्या आई-वडिलांचा विचार वेगळा होता. तुमचा विचार त्यांच्यापेक्षा वेगळा निघाला, तसाच तुमच्या मुलांचाही विचार तुमच्यापेक्षा वेगळा असणार आहे. आणि हे चुकीचं नाही, तर हाच काळाचा आणि पिढ्यांचा नियम आहे. म्हणून तुमचे विचार, तुमची स्वप्नं, तुमच्या भीती आणि तुमच्या अपूर्ण इच्छा जबरदस्तीने त्यांच्या आयुष्यावर लादू नका. कारण मुलांना फक्त आदेशांची गरज नसते, तर त्यांना गरज असते आधाराची, समजून घेणाऱ्या माणसांची, प्रेमाची, आणि त्यांच्या विचारांना उभं राहण्यासाठी सुरक्षित जागेची. 

त्यांना फक्त एवढी जाणीव द्या, की “काहीही झालं तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत.” विश्वास ठेवा.  मुलं जन्मताच त्यांचे विचार, त्यांची स्वप्नं, त्यांची ओळख आणि त्यांची क्षमता घेऊन आलेली असतात. पालक म्हणून तुमचं काम त्यांना तुमच्यासारखं बनवणं नाही, तर त्यांना “त्यांच्यासारखं” बनू देणं आहे. त्यांच्या विचारांना जन्म घेऊ द्या. त्यांच्या स्वप्नांना वाढू द्या. त्यांना स्वतःच्या चुका करू द्या, शिकू द्या, पडू द्या आणि पुन्हा उभं राहू द्या. कारण प्रत्येक नवीन पिढी ही जगाला काहीतरी नवीन देण्यासाठी जन्माला येत असते. आणि जर प्रत्येक पिढीवर जुन्या विचारांचंच ओझं टाकलं गेलं, तर नवीन विचार जन्म घेण्याआधीच मरून जातात. म्हणून तुमच्या मुलांना फक्त तुमचा वारसा देऊ नका, तर त्यांना स्वतःचा वारसा निर्माण करण्याची संधी द्या. 

कारण एक दिवस, तुमचं मूल फक्त तुमचं नाव पुढे नेणार नाही, तर कदाचित तुमच्या संपूर्ण पिढीचा विचार बदलून टाकेल.

आणि तुम्हाला ही, मनापासून शुभेच्छा❤️

Comments

Anonymous said…
👍🏻👌🏻

Popular posts from this blog

आईच्या अभिमानासाठी…भाग-1

स्वतःला ओळखण्याचा प्रवास हा कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो.

प्रिय गायत्रीस्...❤️