स्वतःला ओळखण्याचा प्रवास हा कधीच संपत नाही, तर तो फक्त रूप बदलत राहतो.
वाटा चालताना कधी समजत नाही, त्या आपल्याला कुठे घेऊन जातील, पण शेवटी कळतं त्या वाटांनीच आपल्याला आपली ओळख दिलेली असती. आयुष्यातला प्रवास संपतच नाही, जन्मापासून सुरू झाला की, जिंदगीला फुलस्टॉप भेटल्यावरच काय तो संपतो ....!! बालपणातलं स्वतःशीच खेळणं सर्वांना आवडतं, पण जेव्हा मोठे होतो, जबाबदारी येते, तेव्हा स्वतःशी खेळणं अन् पचवणं जिकिरीचं असतं, कठीण जातं. नंतर थोडे मोठे झालो, तर कुतूहलाने रांगत रांगत जाऊन आई बाबांच्या पायाला धरून उठण्याचा प्रयत्न करणं, आपल्यासाठी अन् आपलं कौतुक करणाऱ्या हितचिंतकांसाठी तो आनंदाचा क्षण असतो, पण आत्ता प्रवासात चालताना कुठं धडपडल्यासारखं झालं, तरी आई-बाबांना खुशालीतच आहे, हे पटवून देण्यात जास्त आनंद वाटतो . आणखी वर्ष-सहा महिन्यांचं झाल्यावर आधार घेऊन उठून, छुन-छुन घातलेल्या पायांनी पहिलं पाऊल टाकताना आई-बाबाने वाजवलेल्या टाळ्या अन् चेहऱ्यावर ओथंबून वाहणारा आनंद आजही हर्षभरीत करून जातो, पण आत्ता प्रवासात आधार घ्यावा वाटत नाही, तर आधार व्हावा वाटतो , त्यांतच आनंद वाटतो. जीवनात असे खूप प्रवास करावे लागतात, पण जीवनातला प्रवास संपत नाही हे तितकंच ...